

-rat२७p१४.jpg-
26O59975
राजापूर ः निसर्गसंपदेने नटलेला कोकण परिसर.
-----
‘इकोसेन्सिटिव्ह झोन’वर अद्याप हरकत नाही
राजापुरातील ५१ गावांचा समावेश; अधिसूचनेनंतर दीड महिना उलटला
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २७ ः पश्चिम घाटातील पर्यावरण संवर्धनासाठी जाहीर करण्यात आलेल्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या अधिसूचनेवर राजापूर तालुक्यातून अद्याप एकही हरकत दाखल झालेली नाही. तालुक्यातील ५१ गावांचा या क्षेत्रात समावेश असून, हरकती नोंदवण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यामुळे शेवटच्या काही दिवसांत हरकती दाखल होणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
पश्चिम घाटातील निसर्गसंपदेच्या जतनासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने काही क्षेत्रे पर्यावरण संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ३०४ गावांचा यात समावेश असून, राजापूर तालुक्यातील ५१ गावे या यादीत आहेत.
याबाबतची अधिसूचना २७ जुलैला प्रसिद्ध झाली. शासनाने नागरिकांकडून ६० दिवसांत हरकती मागवल्या आहेत; मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होऊन दीड महिना उलटला असतानाही महसूल प्रशासनाकडे तालुक्यातून एकही हरकत दाखल झालेली नाही. हरकत नोंदवण्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत असल्याने आता उर्वरित कालावधीत नागरिकांकडून हरकती दाखल होणार का, याची उत्सुकता आहे.
-----
ही समाविष्ट गावे
वाटूळ, कुंभवडे, शेजवली, मोसम, पन्हळेतर्फ सौंदळ, पांगरे बुद्रुक, कोळवणखडी, हर्डी, पाथर्डे, केळवडे, खिणगिणी, आग्रेवाडी, कोतापूर, चिखले, कोंडदसूर, बागकाझी हुसेन, गोठणेदोनिवडे, वरची गुरववाडी, भराडे, कोंडसर खुर्द, हसोळतर्फ सौंदळ, जांभवली, फुपेरे, ओशिवळे, सौंदळ, तिवरे, प्रिंदावण, बांदीवडे, वाल्ये, महाळुंगे, डोंगर, धामणपे, हातदे, काजिर्डा, करक, कारवली, कोळंब, मिळंद, पाचल, ताम्हाणे-पहिलीवाडी, पांगरे खुर्द, परूळे, पाटकरवाडी, कोंड्येतर्फ राजापूर, सावडाव, वाल्ये. वरचीवाडी, वाळवड, येरडव, झर्ये, हरळ या गावांचा समावेश आहे.
----
या प्रकल्पांना बंदी
प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘लाल श्रेणीत’ वर्ग केलेल्या कोणत्याही नवीन उद्योगाला किंवा सध्याच्या उद्योगांच्या विस्ताराला परवानगी दिली जाणार नाही. २० हजार वर्गमीटर किंवा त्यापेक्षा जास्त बांधकाम असलेल्या प्रकल्पावर आणि नागरी विकास प्रकल्पावर बंदी असेल. या अधिसूचनेमुळे स्थानिक रहिवाशांचे विस्थापन होणार नाही. त्याचवेळी शेती-बागायती कामांवर कोणताही परिणाम होणार नाही. घरांची दुरूस्ती, विस्तार आणि स्थानिक प्राथमिक आरोग्यकेंद्र उभारणीवर कोणतीही बंदी असणार नाही.
-----
बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाचे काय होणार?
इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर झालेल्या संवेदनशील क्षेत्रात नवीन खाणकाम, उत्खनन आणि वाळू उपशावर पूर्णपणे बंदी असणार आहे. विद्यमान खाणपट्टे हे आगामी पाच वर्षात टप्प्याटप्प्याने बंद करावे लागणार आहेत. असे असताना इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट असलेल्या कुंभवडे लगतचे गाव असलेल्या नाणार येथे बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिलेली आहे. नाणार येथे बॉक्साईट उत्खनन झाल्यास त्याचा परिणाम कुंभवडे येथील पर्यावरण परिसंस्थेवर कमी-जास्त प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे महिन्यामध्ये नाणार बॉक्साईट प्रकल्पाबाबत होणाऱ्या जनसुनावणीमध्ये कोणता निर्णय होणार, याकडे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.