

चिपळूणमधील ४ रस्त्यांसाठी ८४ कोटींचा आराखडा
नगरविकासकडून निधी अपेक्षित; १५ मीटर रूंदीकरणासह काँक्रिटीकरणही
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २७ ः शहरातील वाहतूककोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी चिपळूण नगरपालिकेने चार प्रमुख रस्त्यांचे रूंदीकरण, सुशोभीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी ८४ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे. राज्याच्या नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध होईल, असे पालिकेचे बांधकाम सभापती कपिल शिर्के यांनी सांगितले.
शहराच्या वाढत्या विस्तारासोबतच वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे; मात्र, त्या तुलनेत रस्त्यांची रूंदी व पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत असल्याने मुख्य मार्गांवर वारंवार वाहतूककोंडी होते. पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था, पाण्याचा निचरा न होणे आणि पादचाऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पालिकेने रस्त्यांच्या व्यापक विकासाचा आराखडा तयार केला आहे. शिवाजीचौक, चिंचनाका, बहादूरशेख आणि खेंड परिसरातील प्रमुख रस्त्यांचा या प्रकल्पात समावेश केला आहे. हे रस्ते आवश्यकतेनुसार १५ मीटरपर्यंत रूंद केले जाणार आहेत. त्यामुळे अरूंद रस्त्यांमुळे होणारी वाहतूककोंडी फुटण्यास मदत होईल. रूंदीकरणासोबतच रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार असल्याने वारंवार डांबरीकरणाची गरज भासणार नाही आणि रस्त्यांची टिकवण क्षमता वाढेल. या आराखड्यात नवीन पुलांचे बांधकाम करण्याचे नियोजन आहे. शहरातील प्रमुख मार्गांचा एकात्मिक पद्धतीने विकास झाल्यास वाहतूककोंडी कमी होईल. याचा थेट फायदा बाजारपेठ, शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना होणार आहे. निधी मंजुरीनंतर प्रकल्पाचे काम वेगाने केले जाणार असून, १५ महिन्यांत हे प्रमुख रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, असे शिर्के यांनी सांगितले.
चौकट
वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा
चिपळूणच्या वाहतूककोंडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शहराचा विस्तार आणि व्यापारीक्षेत्रातील गर्दी पाहता तात्पुरत्या दुरूस्तीने हा प्रश्न सुटणारा नाही. त्यामुळे या प्रकल्पाकडे शहराच्या दीर्घकालीन विकासाच्यादृष्टीने पाहिले जात आहे. ही प्रस्तावित कामे नियोजित वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास चिपळूणच्या रस्त्यांचा चेहरामोहरा बदलून वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.