कीर महाविद्यालयात मेहेंदी कार्यशाळा

कीर महाविद्यालयात मेहेंदी कार्यशाळा
Published on

कीर महाविद्यालयात
मेहेंदी कार्यशाळा
रत्नागिरी ः भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्ष, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि लायक्रा ॲकॅडमी यांच्यावतीने ‘एक दिवसीय मेहेंदी प्रशिक्षण कार्यशाळेचे'' आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींचे कौशल्य विकास व आर्थिक सबलीकरण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. लायक्रा अॅकॅडमीच्या मेहेंदी आर्टिस्ट सामिया मापारी यांनी प्रमुख मार्गदर्शक करताना विद्यार्थिनींना मेहेंदी कलेतील विविध तंत्र व डिझाईन्सचे प्रशिक्षण दिले. तसेच मेहेंदी कलेचा उपयोग स्वयंरोजगारासाठी कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. आसावरी मयेकर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांना वाव देऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. तर प्राचार्या मधुरा पाटील यांनी मेहेंदी कलेचा छंदासोबतच स्वयंरोजगार व उद्योजकतेसाठी उपयोग होऊ शकतो, असे सांगत विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. विनय बावदाने, प्रा. विनय कलमकर, प्रा. राखी साळगावकर, प्रा. आसावरी मयेकर व अन्य प्राध्यापक उपस्थित होते.

-------
समाजकल्याणतर्फे
नवउद्योजकांसाठी योजना
रत्नागिरी ः अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील घटकांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्टँडअप् इंडिया’ योजनेअंतर्गत ‘मार्जिन मनी योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नवउद्योजक व महिला उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे. या योजनेतून १० लाख ते १ कोटी रुपये कर्ज दिले जाणार आहे. प्रकल्प मुल्याच्या ७५ टक्के रक्कम बँकेमार्फत कर्जस्वरूपात दिली जाईल. त्यातील १५ टक्के रक्कम राज्यशासनामार्फत मार्जिन मनी स्वरूपात उपलब्ध होणार आहे. तसेच स्वहिस्सा केवळ १० टक्के राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत कर्ज प्रकरण मंजूर असणे आवश्यक आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------

भूमीहीन कुटुंबांना
मिळणार शेतजमीन
रत्नागिरी ः महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन कुटुंबांना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी ‘कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करावेत, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे. यामध्ये कमाल ४ एकरपर्यंत कोरडवाहू (जिरायती) जमीन प्रतिएकर कमाल ५ लाख रुपये दिले जाणार आहेत. ओलिताखालील (बागायती) जमिनीसाठी कमाल २ एकरपर्यंत प्रतिएकर ८ लाख मर्यादेत देण्यात येतील. इच्छुकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, पहिला मजला, कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधून अर्ज सादर करावेत, असे आवाहन सोनटक्के यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com