कोकण आयुक्तांचा उद्यापासून जिल्हा दौरा

कोकण आयुक्तांचा उद्यापासून जिल्हा दौरा
Published on

कोकण आयुक्तांचा
उद्यापासून जिल्हा दौरा
रत्नागिरी ः कोकण विभागाच्या विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रूबल अगरवाल २ आणि ३ सप्टेंबरला रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दरम्यान जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण, महसूलविषयक कामकाज, मतदान केंद्रे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा तसेच लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. बुधवारी (ता. २) चिपळूण उपविभागीय अधिकारी कार्यालयाला अगरवाल भेट देतील. त्यानंतर त्या मतदान केंद्र व नगरपालिका, ग्रामपंचायतीस प्रत्यक्ष भेट देतील. दुपारी त्या चिपळूण व रत्नागिरी मतदार संघातील शाळेतील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करतील. जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ या वेळेत एसआयआर व महसूल विषयांबाबत संबंधित सर्व अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच, सायंकाळी ५ ते ६ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. गुरूवारी (ता. ३) सकाळी त्या राजापूर नगरपालिका व स्थानिक मतदान केंद्रांची पाहणी करतील आणि पुढील दौऱ्यासाठी त्या कणकवलीकडे (सिंधुदुर्ग) रवाना होतील.
--------------------
राज्यभरात २९ला
रोजगार महाकुंभ
रत्नागिरी ः राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी २९ सप्टेंबर रोजी राज्यभरात रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी उपलब्ध करून दिलेला क्युआर कोड स्कॅन करून तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे. या रोजगार महाकुंभासाठी उद्योग, नामांकित कंपन्या, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, मोठी आस्थापने तसेच सेवाक्षेत्रातील रोजगारदात्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यात आला आहे. रिक्त पदांची संख्या, पदनिहाय पात्रता आणि आवश्यक कौशल्यांची निश्चिती करून जास्तीत जास्त कंपन्यांना या मेळाव्यात सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे. आयटीआय, कौशल्य प्रशिक्षण केंद्रे, महाविद्यालये, विद्यापीठे तसेच जिल्हा रोजगार कार्यालयांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जात आहे. यामध्ये महिला, दिव्यांग, ग्रामीण युवक आणि अल्प उत्पन्नगटातील उमेदवारांचा सहभाग वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
--------
खेड, चिपळूणमध्ये
कल्याण संघटकांचे दौरे
रत्नागिरी ः जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर नारी, वीर माता व वीर पिता यांच्या विविध अडचणी व समस्या जागेवरच सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत पुढाकार घेण्यात आला आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये कल्याण संघटकांच्या विशेष दौऱ्यांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली. या दौऱ्यांदरम्यान माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणारे अभिलेख कार्यालयविषयक प्रश्न, पेन्शनविषयक अडचणी, महासैनिक पोर्टलवर नवीन नोंदणी तसेच इतर सर्व प्रशासकीय अडचणींचे जागेवरच निवारण केले जाणार आहे. ७, १६, २१ व २८ सप्टेंबरला खेड येथील सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे कल्याण संघटक उपस्थित राहतील. ८, १५, २२ व २९ सप्टेंबरला चिपळूण सैनिकी मुलांचे वसतिगृहात कल्याण संघटक उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व पात्र माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या केंद्रावर ठरवून दिलेल्या तारखेला उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने केले आहे.
--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com