

( सदराप्रमाणे )
जागतिक नारळ दिन--------लोगो
कल्पवृक्ष नारळ : अन्न, ऊर्जासह
उपजीविकेचा भक्कम आधार
महाराष्ट्रात मुख्यत्वे कोकण किनारपट्टीच्या भागात नारळाचे क्षेत्र अधिक आहे. राज्याच्या एकूण नारळ क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्र एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्गानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नारळाला आपण ‘कल्पवृक्ष’ मानतो. कोकणात नारळ उत्पादनासाठी पोषक वातावरण असले तरी भौगोलिक परिस्थितीमुळे क्षेत्रविस्ताराला काही मर्यादा आहेत; मात्र, उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून हे चित्र बदलता येऊ शकते...!
- डॉ. किरण मालशे,
कृषीविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये
---
दरवर्षी २ सप्टेंबरला जगभरात ‘जागतिक नारळ दिन’ साजरा केला जातो. नारळ उत्पादक शेतकरी आणि उपभोक्ते यांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आशियाई पॅसिफिक नारळ समुदायाच्या पुढाकाराने २००९ पासून आशियाई देशांमध्ये नारळ उत्पादन, विपणन व निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. नारळाचे सामाजिक, आर्थिक व आरोग्यदायी फायदे लोकांपर्यंत पोहोचवून जागरूकता निर्माण करणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. २०२६च्या जागतिक नारळ दिनाची संकल्पना ‘अनिश्चिततेच्या काळात नारळ ः अन्न, ऊर्जा आणि उपजीविका सुरक्षित करणे’ अशी आहे.
जागतिक स्तरावर नारळ उत्पादनात भारत देश पहिल्या क्रमांकावर आहे. लागवडीखालील क्षेत्राच्या बाबतीत फिलिपाईन्स आणि इंडोनेशियानंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतामध्ये सुमारे २१.९५ लाख हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड असून, जगातील एकूण उत्पादनापैकी तब्बल ३०.३७ टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. पुराणकाळापासूनच भारतामध्ये नारळाला धार्मिक, आर्थिक आणि औद्योगिक महत्त्व आहे. नारळ व नारळावर आधारित उत्पादनांचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर परकीय चलनही मिळते. या उद्योगाच्या माध्यमातून दररोज लाखो नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर नारळाची लागवड आहे. देशात नारळ लागवड क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्राचा सातवा तर एकूण उत्पादनात नववा क्रमांक लागतो (केरळ, तमिळनाडू आणि आंध्रप्रदेश ही राज्ये या क्षेत्रात अग्रेसर आहेत). महाराष्ट्रात मुख्यत्वे कोकण किनारपट्टीच्या भागात नारळाचे क्षेत्र अधिक आहे. राज्याच्या एकूण नारळ क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्र एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्गानंतर रत्नागिरी जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. नारळाला आपण ‘कल्पवृक्ष’ मानतो. कोकणात नारळ उत्पादनासाठी पोषक वातावरण असले तरी भौगोलिक परिस्थितीमुळे क्षेत्रविस्ताराला काही मर्यादा आहेत; मात्र, उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून हे चित्र बदलता येऊ शकते. नारळ हे वर्षभर उत्पन्न देणारे बागायती पीक आहे.
* नारळाचे उत्पादन वाढवून त्याची उत्तम मूल्यसाखळी तयार केल्यास कृषी-उद्यमशीलतेला मोठा वाव आहे. यासाठी पुढील बाबींवर भर देणे आवश्यक आहे.
- सुधारित आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची योग्य पद्धतीने लागवड व जोपासना
- एकात्मिक व काटेकोर शेतीपद्धतीचा अवलंब
- योग्य काढणी आणि काढणीपश्चात व्यवस्थापन
- शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करून संघटित पद्धतीने नारळ व काथ्या उत्पादनाचे मूल्यवर्धन.
शासनानेही या पिकाला पाठबळ दिले असून, २०२६-२७ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात नारळपिकाला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना मंजूर करण्यात आल्या आहेत शिवाय, महाराष्ट्र शासनाने २०२६-२७ या वर्षापासून नारळ पिकासाठी ‘हवामान आधारित फळपीक विमा योजना’ नव्याने लागू केली आहे. बदलते वातावरण, वेगाने होणारे शहरीकरण आणि बदलती जीवनशैली या आव्हानांच्या काळात नारळशेतीमध्ये अन्न, ऊर्जा आणि उपजीविका सुरक्षित करण्याची मोठी ताकद आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.