संगमेश्वरात एनसीएमसी स्मार्ट कार्डचा गोंधळ

संगमेश्वरात एनसीएमसी स्मार्ट कार्डचा गोंधळ
Published on

26O61672
एआय चित्र

‘एनसीएमसी कार्ड’चा गोंधळ कायम
संगमेश्वरात नेटवर्क, रिचार्जची समस्या; ग्रामीण भागात जनजागृती गरजेची
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः : एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी ‘एनसीएमसी स्मार्टकार्ड’ अनिवार्य केल्यानंतर ग्रामीण भागातील प्रवाशांमध्ये या योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. डिजिटल पद्धतीने सवलतीच्या प्रवासाची नोंद करण्याचा उद्देश असला तरी संगमेश्वर तालुक्यात नेटवर्कची समस्या, कार्ड न स्वीकारणे, रिचार्जची रक्कम अद्ययावत न होणे आणि कार्डमध्ये पुरेशी शिल्लक नसणे यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची समस्या कायम असते. अशा ठिकाणी स्मार्टकार्डची यंत्रणा व्यवस्थित कार्यरत न राहिल्यास त्याचा थेट परिणाम प्रवासी आणि वाहकांवर होत आहे. कार्ड असूनही सवलत मिळाली नाही आणि काही प्रवाशांना पूर्ण तिकीट काढावे लागल्याने बसमध्ये वादाचे प्रसंगही घडू लागले आहेत.
काही प्रवाशांकडे कार्ड असले तरी त्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने सवलतीचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे ‘स्मार्टकार्ड म्हणजे केवळ सवलतीचे ओळखपत्र की, त्यामध्ये पैसे भरून ठेवावे लागतात?’ असा प्रश्न अनेक प्रवाशांना पडला आहे.
नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाते. हे कार्ड प्री-पेड पाकिटाप्रमाणे वापरले जाते. त्यामध्ये किमान १०० रुपये शिल्लक ठेवण्याची अट असून, ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्ड मशिनने स्वीकारले नाही, रिचार्जची रक्कम दिसली नाही किंवा कार्डमध्ये पुरेशी शिल्लक नसल्यास सवलतीच्या तिकिटाऐवजी पूर्ण तिकीट काढावे लागण्याची वेळ प्रवाशांवर येऊ शकते. त्यामुळे सवलतीच्या प्रवासावर अवलंबून असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील प्रवाशांना स्मार्टकार्डची संपूर्ण माहिती देण्यासाठी एसटी प्रशासनाने बसस्थानकांसह गावागावात जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे. कार्ड कसे वापरायचे, किती रक्कम शिल्लक ठेवायची, रिचार्ज कसे करायचे आणि तांत्रिक अडचण आल्यास सवलत कशी मिळणार, याबाबत स्पष्ट सूचना देणे गरजेचे आहे.
---
कोट
स्मार्टकार्डची योजना चांगली असली तरी ग्रामीण भागातील नेटवर्क आणि तांत्रिक अडचणींचा विचार करणे आवश्यक आहे. कार्ड असूनही सवलत मिळत नसेल तर प्रवाशांना पूर्ण तिकीट काढावे लागणे अन्यायकारक ठरू शकते. एसटी महामंडळाने तातडीची तांत्रिक मदत आणि पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
-सुरेश भायजे, पदाधिकारी, बहुजन विकास आघाडी
---
कोट
एनसीएमसी स्मार्टकार्ड ही प्रवाशांच्या सोयीसाठी उपयुक्त व्यवस्था आहे; मात्र काही ठिकाणी नेटवर्क तसेच इतर तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत तांत्रिक अडचण असलेल्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे तिकीट देण्याच्या सूचना दिल्या आहेत
-अश्वजित जानराव, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com