

‘तीस वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’
असंसर्गजन्य आजारांची होणार तपासणी ; जिल्ह्यात आरोग्य विभागाची मोहीम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ४ ः ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ‘३० वर्षांचा पल्ला, तपासणी अन् सल्ला’ हे १०० दिवसांचे विशेष असंसर्गजन्य आजार स्क्रिनिंग अभियान १ सप्टेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील ३० वर्षे व त्यावरील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान व उपचार उपलब्ध करून देणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.
आरोग्य विभागाच्या या अभियानांतर्गत नागरिकांचा रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, उंची आणि बीएमआय यांची तपासणी केली जाणार आहे. तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासाठी प्राथमिक स्क्रिनिंग करण्यात येईल. तपासणीदरम्यान संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना पुढील मोफत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात संदर्भित केले जाणार आहे. उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे न दाखवता वाढतात. ‘मला त्रास नाही म्हणजे मी निरोगी आहे,’ हा गैरसमज बाजूला ठेवून ३० वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्यमंदिरे, प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालयांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जात आहे.
----
तपासणीला प्रतिसाद द्या
प्रत्येक ३० वर्षांवरील नागरिकाने तपासणी करून निरोगी कुटुंब व समृद्ध समाजासाठी सहभाग नोंदवावा. नियमित तपासणीसोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि व्यसनमुक्त जीवनशैली अंगीकारले पाहिजे. आजची तपासणी, उद्याचे निरोगी आयुष्य, या सूत्रानुसार सर्व नागरिकांनी जवळच्या शासकीय आरोग्यकेंद्रात जाऊन या तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.