

सवलतीसाठी कार्डची सक्ती रद्द करा
‘कोकणकन्या’ फाउंडेशन ; एसटी महामंडळाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी ‘राष्ट्रीय सामायिक प्रवासकार्ड’ अनिवार्य करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी कोकणकन्या सोशल वेल्फेअर फाउंडेशनने केली आहे. याबाबत एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन देण्यात आले असून, त्याची प्रत परिवहनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडेही पाठवण्यात आली आहे.
या कार्डची नोंदणी करताना संकेतस्थळाची सेवा खंडित होणे, भ्रमणध्वनीवर पडताळणी क्रमांक न मिळणे, आधारजोडणीतील अडथळे, कार्डमध्ये पैसे भरण्यात अडचणी तसेच नोंदणी केंद्रांवरील गर्दी यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना संगणकीय प्रक्रियेची माहिती नसल्याने ही प्रक्रिया अधिक त्रासदायक ठरत आहे.
गणेशोत्सव, दिवाळीसारख्या सणांच्या काळात एसटीने मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अशावेळी सवलतीचे कार्ड उपलब्ध नसल्यास पूर्ण तिकीट आकारले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या सवलतीचा लाभ घेण्याऐवजी प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो.
कार्ड व्यवस्था पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत त्याची सक्ती स्थगित करून आधारकार्ड, मतदार ओळखपत्र किंवा जुन्या सवलत कार्डाच्या आधारे पूर्वीप्रमाणे सवलत द्यावी. सक्ती कायम ठेवायची असल्यास प्रत्येक बसस्थानकावर स्वतंत्र कक्ष व तक्रार निवारण केंद्र सुरू करावे, अशी मागणी ॲड. वृषाली सावंत, पूनम सावंत, ॲड. प्रियांका वाटेकर यांच्यासह महिलांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.