

अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याची प्रतिक्षाच
गणेशोत्सवात खाद्यपदार्थांच्या तपासणीची गरज; प्रभारींमुळे कार्यवाहीबाबत संभ्रम
चिपळूण, ता. ८ : सणांच्या पार्श्वभूमीवर चिपळूण शहरातील मिठाई दुकानांमध्ये पेढे, मोदक, लाडू, बर्फी, श्रीखंड तसेच खव्याच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. पदार्थांचा दर्जा आणि संभाव्य भेसळ यावर नजर ठेवणारी यंत्रणा किती प्रभावी आहे, याबाबत ग्राहकांमधून प्रश्न उपस्थित केला जातो. सध्या रत्नागिरी जिल्ह्याला अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिकारीच नसल्याने अन्नपदार्थ तपासणी कार्यवाहीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाचा कारभार कधी सिंधुदुर्गच्या तर कधी रायगडच्या अधिकाऱ्यांकडे दिली जाते. या वेळी पदभार सिंधुदुर्गच्या अधिकाऱ्यांकडे आहे. सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी वाढल्याने खवा, दूध, तूप, सुकामेवा, खाद्यतेलसारख्या कच्च्या मालाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचा कच्चा माल वापरला जात नाही ना, याची काटेकोर तपासणी होणे गरजेचे आहे; मात्र, जिल्ह्याला कायमस्वरूपी अधिकारी नसताना चिपळूण शहर आणि ग्रामीण भागातील मिठाई विक्रेत्यांची नियमित तपासणी कितपत होते, हा प्रश्न कायम आहे.
चिपळूणमध्ये यापूर्वी मुदतबाह्य शीतपेयांच्या विक्रीचा प्रकार समोर आला होता. त्याबाबत एफडीएकडे तक्रारही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची मागणी जोर धरत आहे. चिपळूण शहर आणि तालुक्यात आतापर्यंत किती मिठाई दुकाने तपासण्यात आली, किती नमुने घेण्यात आले आणि तपासणीत कोणत्या त्रुटी आढळल्या, याची माहिती ग्राहकांसमोर येणे आवश्यक आहे. तपासणी केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष बाजारपेठेत दिसणे गरजेचे आहे.
चौकट
उत्पादन केंद्रांवरही तपासणीची गरज
मिठाई तयार केल्याची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख, वजन आणि पॅकिंगसंबंधी माहिती ग्राहकांना स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. अनेकदा मिठाई किंवा बेकरी पदार्थ दुकानाऐवजी अन्य ठिकाणी तयार करून विक्रीसाठी आणले जातात. त्यामुळे अशा उत्पादन केंद्रांची स्वच्छता, कच्च्या मालाची गुणवत्ता आणि पदार्थांची साठवणूक यांचीही तपासणी होणे आवश्यक आहे. गणेशोत्सवात ग्राहकांची गर्दी वाढत असल्याने मिठाई दुकाने, गोदामे आणि उत्पादन केंद्रांवर अचानक तपासणी करावी. संशयास्पद पदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. जिल्ह्याला कायमस्वरूपी एफडीए अधिकारी उपलब्ध नसल्याने सणासुदीच्या काळात तपासणीची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्ह्यासाठी सक्षम आणि कायमस्वरूपी अन्नसुरक्षा यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज असून, गणेशोत्सवाच्या काळात चिपळूणच्या बाजारपेठेवर प्रभावी देखरेख ठेवण्याची मागणी होत आहे.
कोट
जिल्ह्यात एकूण किती ग्राहक आहेत हे निश्चित सांगता येत नाही; पण आम्ही अचानक तपासणीची मोहीम सुरू केली आहे.
- ललित गायकवाड, एफडीए, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.