

रत्नागिरीत शनिवारी
राष्ट्रीय लोकअदालत
रत्नागिरी ः राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरीतर्फे १२ सप्टेंबरला जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये ‘राष्ट्रीय लोकन्यायालया’चे आयोजन केले आहे. या अदालतीमध्ये विविध प्रकारची प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तडजोडपात्र फौजदारी खटले, कौटुंबिक वाद, चेक बाउन्स (कलम १३८), दिवाणी वाद तसेच मामलेदार कोर्टातील प्रलंबित प्रकरणे, विद्युत महावितरण कंपनी, विविध बँका व पतसंस्थांची थकीत कर्ज प्रकरणे तसेच नगरपरिषद व ग्रामपंचायतींची थकीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे यात समाविष्ट केली आहेत. तसेच नागरिकांनी या अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले वाद सामोपचाराने व विनाखर्च मिटवावेत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यात श्रीगणेशा
आरोग्य अभियान
रत्नागिरी ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा अभियान २०२६’ राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर कालावधीत समुदाय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सचिवालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष’ व ‘धर्मादाय रुग्णालय मदतकक्ष’ यांच्या समन्वयाने ही मोहीम राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या, आवश्यक रक्तचाचण्या, ईसीजी तपासणी, इतर आनुषंगिक व उपचारात्मक तपासण्या आणि मोफत औषधोपचार ही शिबिरे यशस्वी करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धर्मादाय आयुक्त, नगरपालिका प्रशासन, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी, निदानात्मक साधने आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
‘डायलॉग क्विझ’चे
रत्नागिरीत आयोजन
रत्नागिरी ः राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा, या उद्देशाने ''विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ क्विझ''चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवाधिकारी सम्राट पाटील यांनी केले आहे. हा उपक्रम देशातील युवापिढीला आपले ज्ञान, सर्जनशीलता, विचार आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका निर्णायक ठरणार असून, हा उपक्रम त्यांना थेट राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेशी जोडणारा दुवा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील युवक-युवतींनी स्वतः सहभागी होण्यासोबतच इतर सहकाऱ्यांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी नमूद केले. यासाठी mybharat.gov.in/vbyld-२०२७ या नोंदणी संकेतस्थळावर २० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावयाची आहे, असे पाटील यांनी सांगितले.
‘सार्वजनिक गणेशोत्सव’साठी
११ पर्यंत अर्ज करा
रत्नागिरी ः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि लोकोत्सवाचा गौरव करणाऱ्या ‘महागणेशोत्सव २०२६’ अंतर्गत राज्यशासनाच्यावतीने ‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ चे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ११ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय अशा विविध पातळ्यांवर सर्वोत्कृष्ट मंडळांची निवड करून त्यांना गौरवण्यात येणार आहे. इच्छुक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ganeshotsav.pldmka.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ११ सप्टेंबरपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी. महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची गौरवशाली परंपरा जपत पर्यावरणपूरक आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.