

पैसा बोलतो, आपण ऐकतो?.................लोगो
(४ सप्टेंबर टुडे ३)
आर्थिक स्वातंत्र्यासाठी मेहनत; पण
बनतात सामाजिक अपेक्षांचे कैदी
महागडं घड्याळ वेळ दाखवण्यापेक्षा प्रतिष्ठा दाखवतं. मोठी गाडी प्रवासापेक्षा प्रतिष्ठेचं प्रतीक बनते म्हणजेच काही आर्थिक निर्णय व्यवहारापेक्षा सामाजिक संदेश देण्यासाठी घेतले जातात. काही वेळा यशस्वी ‘दिसणं’ हे आर्थिकदृष्ट्या स्थिर ‘असण्यापेक्षा’ अधिक महत्त्वाचं बनतं. याचा अर्थ असा नाही की, चांगलं घर, चांगली गाडी किंवा आरामदायी जीवन चुकीचं आहे. प्रश्न खर्चाचा नसतो; प्रश्न त्या खर्चामागच्या कारणांचा असतो. एखादी गोष्ट आपल्या गरजा, प्राधान्यक्रम आणि आर्थिक क्षमतेनुसार घेतली जात असेल तर त्यात चुकीचं काहीच नाही; पण निर्णय तुलना, सामाजिक दबाव किंवा मान्यता मिळवण्याच्या इच्छेतून घेतले जात असतील तर आर्थिक समतोल बिघडू लागतो. आर्थिक शहाणपण म्हणजे साधं जगणं नव्हे तर जाणीवपूर्वक जगणं आहे.
- rat१०p१३.jpg-
26O63011
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
---
आपण अनेक आर्थिक निर्णय स्वतः घेतो, असं आपल्याला वाटत असतं; पण प्रत्यक्षात त्या निर्णयांमध्ये समाज, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सामाजिक प्रतिष्ठा यांचा मोठा प्रभाव असतो. ‘लोक काय म्हणतील?’ हा प्रश्न भारतीय मध्यमवर्गीय मानसिकतेत इतका खोलवर रुजलेला आहे की, अनेकदा आर्थिक गणितापेक्षा सामाजिक प्रतिष्ठा महत्त्वाची ठरते. विशेष म्हणजे हा दबाव नेहमी उघडपणे दिसत नाही तो अनेकदा तुलना, प्रतिष्ठा आणि स्वीकार मिळवण्याच्या इच्छेमधून काम करत असतो. याची सुरुवात अगदी छोट्या गोष्टींपासून होते. लग्नसमारंभ किती मोठा असावा, वाढदिवस कसा साजरा करावा, कोणती गाडी घ्यावी, कोणत्या भागात घर असावं, मुलांना कोणत्या शाळेत घालावं, अशा अनेक निर्णयांमध्ये दुर्दैवाने गरजेपेक्षा सामाजिक प्रतिष्ठेचा प्रभाव जास्त असतो. ‘कमीपणा दिसता कामा नये,’ ही भावना अनेकदा आर्थिक क्षमतेपेक्षा मोठे खर्च करवून घेते.
काही वेळा कुटुंबांची अनेक वर्षांची बचत किंवा कर्जक्षमता ही एका सामाजिक कार्यक्रमात खर्च होताना दिसते. विशेषतः मध्यमवर्गीय समाजात तुलना ही एक सतत चालणारी प्रक्रिया असते. कोणाचा पगार किती, कोण कुठे फिरायला गेला, कोणत्या घरात कोणती वस्तू आली, कोणाची मुलं कोणत्या कॉलेजमध्ये गेली, या सगळ्यांमधून नकळत आर्थिक स्पर्धा तयार होत जाते. या स्पर्धेला अधिक तीव्र करण्यामध्ये सामाजिक माध्यमांचाही मोठा वाटा आहे. लोक इतरांच्या आयुष्यातील निवडक आणि आकर्षक क्षण पाहतात; पण त्यामागचं आर्थिक वास्तव बघत नाहीत. त्यामुळे अनेकदा तुलना ही वास्तवाशी नसून प्रतिमेशी होत असते. अनेक लोक दुसऱ्यांच्या ‘highlight reel’ शी स्वतःच्या वास्तविक आयुष्याची तुलना करत असतात.
याचा परिणाम आर्थिक निर्णयांवर दिसू लागतो. काही लोक गरज नसतानाही मोठी कर्ज घेतात. काहीजण उत्पन्नाच्या मानाने अतिशय महाग घर किंवा गाडी घेतात. काहीवेळा लग्न किंवा सामाजिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलं जातं. सुरुवातीला हे निर्णय ‘एकदाच तर आहे’ किंवा ‘सगळेच करतात’ असं वाटत असलं तरी पुढे त्याचं रूप आर्थिक तणावात बदलू शकतं. अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक समस्या उत्पन्न कमी असल्यामुळे नसतात तर सामाजिक अपेक्षांशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नांमुळे निर्माण होतात. यात आणखी एक सूक्ष्म मुद्दा आहे. अनेकदा लोक खर्च वस्तूसाठी करत नाहीत तर त्या वस्तूमुळे मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी करत असतात.
यात एक विसंगतीही दिसते. अनेक लोक आर्थिक स्वातंत्र्यासाठी मेहनत करत असतात; पण त्याचवेळी सामाजिक अपेक्षांचे कैदी बनतात. पैसा कमावण्यामागचा उद्देश अधिक स्वतंत्र आयुष्य जगता येणे, असा असावा; पण अनेकदा तोच पैसा दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात खर्च होतो. शेवटी आर्थिक ताण हा केवळ आकड्यांचा प्रश्न राहत नाही; तो मानसिक थकव्याचाही प्रश्न बनतो म्हणूनच आर्थिक साक्षरतेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वतःच्या आर्थिक निर्णयांमधील सामाजिक दबाव ओळखणं. ‘मला खरंच हे हवं आहे का? की, मला ते इतरांना दाखवायचं आहे?’ हा प्रश्न अनेकदा लाखो रुपयांचे चुकीचे निर्णय टाळू शकतो. आर्थिक स्थैर्याची सुरुवात उत्पन्नातून होत नाही; ती स्वतःच्या प्राधान्यक्रमांबद्दल प्रामाणिक स्पष्टता आल्यावर होते.
(लेखक सीए असून, रत्नागिरीत प्रॅक्टिस करत आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.