रहाटागर बसस्थानक ओस!

रहाटागर बसस्थानक ओस!
Published on

rat१०p७.jpg-
26O63003
रत्नागिरी ः कोट्यावधी रुपये खर्च केलेले रहाटागर बसस्थानक आता ओस पडले आहे.
rat१०p८.jpg-
26O63004
प्रवाशांसाठीची शेड देखील रिकामी आहे.
rat१०p९.jpg-
26O63005
स्थानिकांचे तेथील व्यवसाय बंद झाले आहेत.
rat१०p१०.jpg-
26O62999
कर्नाटकच्या गाड्या या ठिकाणी पार्किंग केल्या जातात.
----

ग्राऊंड रिपोर्ट ... लोगो

रत्नागिरीतील रहाटागर बसस्थानक ओस!
२९ कोटींवर फेरले पाणी; कर्नाटक बससाठी पार्किंग, स्थानिक व्यावसायिकांना फटका

आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर शहरातील हायटेक मध्यवर्ती बसस्थानक दिमाखात उभे राहिले आणि प्रवाशांच्या सेवेत दाखल झाले; मात्र, या नव्या बसस्थानकाच्या चकचकाटाखाली रत्नागिरीतील ‘रहाटागर’ बसस्थानक मात्र पूर्णपणे ओस पडले आहे. दोन वर्षांपूर्वी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तात्पुरत्या वाहतुकीसाठी ज्या बसस्थानकावर २९ कोटींचा निधी खर्च करण्यात आला ते रहाटार बसस्थानक आज धूळखात पडून आहे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेचा पैसा पाण्यात गेलाच; पण त्याचसोबत या स्थानकावर अवलंबून असणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. आता रहाटागर केवळ कर्नाटकच्या गाड्यांसाठी फक्त पार्किंग आणि मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांचा आश्रय बनले आहे.

- राजेश शेळके, रत्नागिरी
---
* रहाटागरवर कोट्यवधींचा खर्च
मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्रचनेचे काम आठ वर्षे रखडले होते तेव्हा रत्नागिरीकरांसाठी रहाटाघर हेच मुख्य दळणवळणाचे केंद्र बनले. शहरी, ग्रामीण आणि मुंबई-पुण्यासह लांब पल्ल्याच्या सर्व गाड्या याच स्थानकातून चालवल्या जात होत्या. या तात्पुरत्या व्यवस्थेसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) आणि प्रशासनाने रहाटागर स्थानकाचे नूतनीकरण केले. प्रवाशांसाठी शेड, काँक्रिटीकरण, प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आणि गाड्यांच्या दुरूस्तीची तात्पुरती शेड उभारण्यासाठी २९ कोट्यवधीवर निधी खर्ची घालण्यात आला. यामुळे रहाटागर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलून गेला. एका नव्या रूपात हे बसस्थानक प्रवाशांच्या दिमतीला उभे राहिले. संपूर्ण गाड्या या बसस्थानकातून सुटू लागल्याने तेथे स्थानिकांनी छोटे व्यवसाय सुरू केले. टपऱ्या, छोटी दुकाने थाटली. याला चांगला प्रतिसाद मिळत गेला. रोजगाराचे नवे साधन उभे राहिले. बसस्थानकातील गाळेदेखील भाड्याने गेले. यातून एसटीला उत्पन्न सुरू झाले.

*दीर्घकाळ सेवा अन् आता ओस
नवीन हायटेक स्थानकाचे काम आठ वर्षे रखडले होते. यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत होती. चुकीच्या ठिकाणी थांबे निर्माण झाल्याने प्रवाशांना उन्हात, पावसात उघड्यावर एसटीची वाट बघत बसावे लागत होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिल्यानंतर ठिकठिकाणी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली; परंतु दोन वर्षांपूर्वी जेव्हा हे नवीन बसस्थानक सुरू झाले तेव्हापासून रहाटागरचा वापर कमी होत गेला. काही काळ लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात होत्या. आता त्याचा वापर पूर्णपणे थांबला आहे. कोट्यवधींचा खर्च करून उभे राहिलेले रहाटागर आज अक्षरशः अनाथ अवस्थेत आहे.

*कर्नाटकच्या गाड्यांचे पार्किंग
ज्या स्थानकातून एकेकाळी शेकडो लालपरींच्या फेऱ्या मारल्या जायच्या तिथे आज एसटीची पूर्ण वाहतूक बंद झाली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, एसटीच्या स्वतःच्या गाड्या आणि प्रवाशांसाठी बांधलेले हे स्थानक आज परराज्यातील म्हणजेच कर्नाटकच्या खासगी बस आणि ट्रक्ससाठी ‘मोफत पार्किंग’ बनले आहे. सुरक्षेची कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपी, गर्दुल्ले आणि असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. प्रवाशांच्या गजबजाटाने फुलणारे हे स्थानक आता भयाण आणि ओस पडलेले दिसते.

*स्थानिक व्यावसायिक रस्त्यावर
रहाटागर बसस्थानक चालू असताना या परिसराला मोठा आर्थिक रोख लाभला होता. एसटी प्रशासनाने बांधलेले गाळे भाड्याने घेऊन अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले होते. याशिवाय, स्थानिकांनी आजूबाजूला छोट्या टपऱ्या, चहा-नाश्त्याचे स्टॉल्स, वर्तमानपत्रे आणि शीतपेयांचे व्यवसाय थाटले होते; मात्र, एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने अचानक गिऱ्हाईक गायब झाले. स्थानकातील गाळे आता कुलूपबंद आहेत तर स्थानिकांच्या टपऱ्यांवर धूळ साचली आहे. अनेकांचे संसार या व्यवसायावर चालत होते, ते आज पूर्णपणे कोलमडले आहेत. ‘नवीन स्थानक झाले याचा आनंद आहे; पण आम्हाला ऐनवेळी वाऱ्यावर सोडून प्रशासनाने आमची उपासमार केली,’ अशी आर्त हाक स्थानिक व्यावसायिक देत आहेत.

*एसटी महामंडळाचा ढिसाळ कारभार
रत्नागिरीसारख्या वाढत्या शहरात वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रहाटागरचा वापर उपस्थानक (Substation) म्हणून सहज करता आला असता. ग्रामीण भागातील किंवा विशिष्ट मार्गावरील गाड्या रहाटागरमधून सोडून मध्यवर्ती स्थानकावरील ताण कमी करता आला असता; परंतु, एसटी महामंडळाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभारामुळे कोट्यवधी रुपयांची पायाभूत सुविधा आज निरूपयोगी ठरली आहे. जनतेच्या पैशांची झालेली ही उधळपट्टी आणि स्थानिकांवर आलेली बेरोजगारी यामुळे रत्नागिरीकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एसटी प्रशासन या ओस पडलेल्या रहाटागर स्थानकाचा पुनर्विकास करून ते पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू करणार की, हे स्थानक कायमचे दुर्लक्षित राहणार, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
-------
कोट १
रहाटागर येथून सध्या कोणत्याही गाड्या सुटत नाहीत; परंतु भविष्यात येणाऱ्या चार्जिंगच्या गाड्यांसाठी रहाटागर हे चार्जिंग हब आणि मेन्टेनन्ससाठी वापर केला जाणार आहे. दीड महिन्यांपूर्वी तसा प्रस्ताव शासनाला दिला आहे.
-अश्वजित जानराव, एसटी विभागीय नियंत्रक, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com