खल्वायन सभा आज रत्नागिरीत

खल्वायन सभा आज रत्नागिरीत
Published on

rat११p१३.jpg
६३२४७
विशारद गुरव

खल्वायन सभा
आज रत्नागिरीत
रत्नागिरी ः खल्वायन, रत्नागिरी या संस्थेची ३२९वी मासिक संगीत सभा शनिवारी (ता. १२) सायंकाळी ६ ते ८ या वेळात नेहमीप्रमाणेच सौ. गोदूताई जांभेकर विद्यालय, बसस्थानकासमोर होणार आहे. कै. अन्नपूर्णा उर्फ गोदुताई अनंत जोगळेकर स्मृती संगीत मैफल म्हणून साजरी होणार आहे. यासाठी जोगळेकर, केळकर, करंदीकर या कुटुंबीयांनी पुढाकार घेतला आहे. या मैफलीत चिपळूण येथील प्रसिद्ध युवा गायक विशारद गुरव यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय व अभंग-नाट्यसंगीते सादर करणार आहेत. विशारद गुरव यांना वयाच्या चौथ्या वर्षापासून वडिलांचे मार्गदर्शन व गाण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. त्यानंतर महेशकुमार देशपांडे यांच्याकडे विशारदपर्यंत शिक्षण त्यांनी घेतले. सध्या पं. प्रसाद गुळवणी यांच्याकडे त्यांचे जयपूर घराणे गायकीचे शिक्षण चालू आहे. या मैफलीला हेरंब जोगळेकर (तबला) व श्रीरंग जोगळेकर (संवादिनी), मंगेश चव्हाण (पखवाज), उदय गोखले (व्हायोलिन) हे साथ संगत करणार आहेत. या मैफलीचा आस्वाद सर्वानी घ्यावा, असे आवाहन खल्वायन संस्थाध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

---------

स्वयंशासन दिन
शिर्के प्रशालेत साजरा
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत १० सप्टेंबर रोजी १०वीच्या विद्यार्थ्यांकडून ''स्वयंशासन दिन'' अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात १०वीच्या छात्र शिक्षकांनी सादर केलेल्या परिपाठाने झाली. या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय सैन्यात ''लेफ्टनंट'' पदावर रूजू झालेले अनिकेत वाडकर यांनी विद्यार्थ्यांना संरक्षणक्षेत्रात करिअर करण्याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिक्षक ए. पी. चव्हाण यांनी सागरमित्र उपक्रमांतर्गत प्लास्टिकच्या पुनर्वापराबाबत विद्यार्थ्यांना मोलाची माहिती दिली. परिपाठानंतर प्रत्यक्ष तासिकांना सुरवात झाली. नियोजनानुसार छात्र शिक्षकांनी विविध वर्गांवर जाऊन वेळेत तास घेतले. या सर्व तासिकांचे परीक्षण शाळा व्यवस्थापन व नियमित शिक्षकांनी केले. मुख्याध्यापक के. डी. कांबळे, उपमुख्याध्यापिका पवार, पर्यवेक्षिका कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रेया वाडकर हिने तर पार्थी मेहेंदळे हिने आभार मानले.

--------

नवनिर्माणमध्ये रंगला
मोदक मेनिया
रत्नागिरी ः येथील नवनिर्माण शिक्षणसंस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागाकडून आयोजित केलेल्या मोदक स्पर्धा आणि प्रदर्शनाला महाविद्यालयातून चांगला प्रतिसाद मिळाला. हॉटेल मॅनेजमेंट विभागतर्फे मोदक मेनियाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत गणपती बाप्पांना आवडणारे विविध चवी, रंग आणि प्रकारच्या सजावटी असणारे मोदक बनवण्यात आले. विशेषकरून हेल्दी मिलेट मोदक, शुगर फ्री दुधी भोपळा मोदक, उकडीचे पान फ्लेवर मोदक, कोकणी स्पेशल मोदक, नाचणी ड्रायफ्रूट मोदक अशा विविध फ्लेवर्सचे मोदक विद्यार्थ्यांनी बनवले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक साक्षी पाटील आणि संगीता नारकर यांना विभागून देण्यात आला. द्वितीय श्रावणी मयेकर आणि तृतीय सोहन घावळी यांनी प्राप्त केला. त्याचबरोबर सार्थक शिंदे आणि दिशी कदम यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. स्पर्धेचे परीक्षण मुग्धा चव्हाण आणि संचालिका सीमा हेगशेट्ये यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com