माखजन- धामापूरच्या श्री देव गणपतीचा 225 वर्षे होतोय उत्सव

माखजन- धामापूरच्या श्री देव गणपतीचा 225 वर्षे होतोय उत्सव
Published on

rat११p५.jpg-
63216
धामापूर (ता. संगमेश्वर) : याच श्रीगणेशाच्या मंदिरात २२५ वर्षे गणेशोत्सव साजरा होत आहे.
rat११p६.jpg-
63217
धामापूर : श्री गणेशाची काळवत्री दगडातील देखणी मूर्ती.

पेशवेकाळापासून २२५ वर्षे रंगतोय गणेशोत्सव
धामापूरचे श्री मंदिर; काळवत्री दगडातील देखणी मूर्ती, पेंडसे कुलवृत्तांतामध्ये उल्लेख
मकरंद पटवर्धन : सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ११ : पेशवेकाळात स्थापना झालेल्या धामापूरच्या (ता. संगमेश्वर) श्रीदेव गणपती मंदिराचा यंदा २२५व्या वर्षी गणेशोत्सव साजरा होत आहे. काळवत्री दगडात कोरलेल्या या गणपतीचा उत्सव भाद्रपद मासात शुद्ध १ ते शुद्ध पंचमीपर्यंत साजरा केला जातो.
धामापूर येथील कासारपऱ्या ओढ्याजवळ पेंडसे कुटुंबीयांचे पूर्वज (कै.) मोरेश्वर केशव तथा बाजी पेंडसे यांनी १८व्या शतकात दृष्टांतानुसार घराशेजारी असलेल्या भातशेतीच्या जागेत उत्खनन केले. तेथे जमिनीत गाडलेली अतिशय सुबक, सुंदर व देखणी अशी काळवत्री दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती मिळाली. १७९९ ते १८०० ला त्यांनी त्या मूर्तीची विधीपूर्वक स्थापना सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराच्या जागेवर, ओढ्याच्या किनारी केली. १८०१पासून श्रींचा उत्सव सुरू झाल्याची नोंद पेंडसे कुलवृत्तांतात आहे. आजही तीच मूर्ती देवळात आहे.
कै. राजाराम मोरेश्वर पेंडसे यांनी श्रींच्यावर छोटी घुमटी बांधली व चुलत्यांनी चालू केलेल्या उत्सवाची जबाबदारी उचलली. १९१२ नंतर कै. जनार्दन, केशव आणि दामोदर पेंडसे यांनी ही उत्सव परंपरा चालू ठेवली. १९४३ला मंदिर सार्वजनिक झाले व गावाचा उत्सव सुरू झाला. १८०१ ते २०२६ अशी २२५ वर्षे हा उत्सव अव्याहतपणे सुरू आहे. १९३५ मध्ये हे मंदिर मावळंगे, धामापूर व माखजन या तीनही गावातील ब्रह्मवृंदांसाठी सार्वजनिक करण्यात आले. मंदिर सार्वजनिक झाल्यानंतर ग्रामस्थांचा उत्साह वाढला व आतापर्यंत मंदिराचा दोन-तीनवेळा जीर्णोद्धार झाला व मंदिराला आत्ता आहे ते रूप प्राप्त झाले. मंदिरात सहस्रावर्तने, एकदिवसीय नामगजर, गोपाळकाला, दरमहा दोन्ही एकादशींना आरती, मंत्रपुष्प, भजन, ''श्रीं''ची पंचामृत पूजा असे धार्मिक कार्यक्रम वर्षभर सुरू असतात. १९४७ मध्ये कै. कृष्णाजी बापट, कै. दामोदर पेंडसे यांनी दर एकादशीला प्रत्येकी पाच आरत्या, देवे, अभंग म्हणण्याची प्रथा सुरू केली. उत्सव दिमाखदार होण्याकरिता कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महादेव पेंडसे, कार्यवाह प्रसन्न बापट, श्रीकांत फाटक आणि खजिनदार अनुप पेंडसे व संजय रानडे आणि सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत.
-------------

चौकट १
भविष्यातील संकल्प
मंदिराच्या आवारात चिऱ्यांची फरसबंदी करणे. विहिरीची डागडुजी करून तिच्या सभोवती संरक्षक कठडा बांधणे. मंदिराची डागडुजी करणे. माखजन, धामापूर व मावळंगे या गावातील शालेय गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे. मंदिर मार्गावर सौरऊर्जेचे पथदीप बसवणे, गरजूंना आर्थिक सहाय्य करणे, असे संकल्प देवस्थानने केले आहेत.
----------
चौकट २
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम
मंदिरात उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात श्री सत्यविनायक पूजा, स्मरणिका प्रकाशन, आरती, भोवत्या, मंत्रपुष्पांजली, हभप मोहकबुवा रायकर, हभप तेजस्विनी जोशी, हभप श्रीनिवास पेंडसे, हभप श्रीकांत फाटक यांची कीर्तने, गायक अमेय आखवे, गायिका प्राजक्ता लेले-जोगळेकर यांचा स्वररंग हा संगीत कार्यक्रम आदी कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com