

rat11p19.jpg-
63254
संगमेश्वर ः आरवली-माखजन रस्त्यावर वाढलेले झाडीझुडपे.
आरवली-माखजन रस्त्यावरील झाडीझुडपे धोकादायक
सार्वजनिक बांधकामाचे दुर्लक्ष; ठाकरे शिवसेना आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ११ : आरवली ते माखजन या ग्रामीण मार्गाच्या दोन्ही बाजूला वाढलेल्या घनदाट झाडीझुडपांमुळे या रस्त्यावरील वाहतूक अत्यंत जीवघेणी बनली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजीपणाविरोधात प्रवासी आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. येत्या दोन दिवसांत ही झाडी न तोडल्यास सोमवारपासून बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माखजन विभागप्रमुख अनिल मोरे यांनी दिला आहे.
आरवली-माखजन हा रस्ता देवरूख, संगमेश्वर आणि रत्नागिरीकडे जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, एसटी बस, स्कूलबस आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याच्या दुतर्फा झाडांची छाटणीच केलेली नाही. पावसाळ्यात ही झाडी अधिक वाढल्याने रस्ता अरूंद झाला असून, वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. यामुळे अचानक ब्रेक लावावे लागून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रात्रीच्या वेळी या झाडीतून वन्यप्राणी थेट रस्त्यावर येण्याची भीती प्रवाशांना वाटत आहे.
येत्या दोन-तीन दिवसांत गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्याहून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी दाखल होणार आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढणार आहे. अशा स्थितीत रस्त्यावरील झाडी तशीच राहिल्यास गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने जेसीबी लावून तत्काळ ही सर्व झाडीझुडपे तोडून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या वर्षभरापासून वारंवार निवेदने देऊनही अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता प्रशासनाने तातडीने कार्यवाही केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार आरवली आणि माखजन परिसरातील ग्रामस्थ व ठाकरेगटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.