

rat१२p६.jpg ः
26O63446
सुधीर मोहिते
---
बॉम्बस्फोटातील तुकडा ३३ वर्षांनी सापडला
‘एमआरआय’ तपासणीने उलगडला सुधीर मोहिते यांच्या शरीरातील रहस्य
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १२ : एका किरकोळ तपासणीदरम्यान वैद्यकीय जगताला अचंबित करणारी आणि तब्बल ३३ वर्षांपूर्वीच्या एका भीषण घटनेच्या स्मृतींना उजाळा देणारी घटना समोर आली आहे. मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटातून वाचलेल्या संगमेश्वर तालुक्यातील चिखली येथील एका रहिवाशाच्या शरीरात गेल्या ३३ वर्षांपासून बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा होता. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात केलेल्या एमआरआय (MRI) तपासणीदरम्यान हा प्रकार उघडकीस आला असून, डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून हा तुकडा बाहेर काढला आहे.
चिखली येथील सुधीर तुकाराम मोहिते (वय ५७) यांना सौम्य स्वरूपाचा ब्रेनस्ट्रोक आल्याने मंगळवारी (८ सप्टेंबर) मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा भाग म्हणून डॉक्टर जेव्हा त्यांची एमआरआय तपासणी करत होते तेव्हा अचानक मशीनमधून विचित्र आवाज येऊ लागला. यामुळे डॉक्टरांनी तातडीने तपासणी थांबवून त्यांना बाहेर काढले. मशिनमध्ये असा आवाज का आला, याचा शोध घेतला असता सुधीर यांच्या ओठाच्या वरच्या बाजूला असलेल्या एका गाठीमुळे हा अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात आले. अधिक बारकाईने तपासणी केली असता ती साधी गाठ नसून कुठला तरी धातूचा तुकडा असल्याचे स्पष्ट झाले.
मुंबईत झालेल्या १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोटाच्या दिवशी सुधीर मोहिते हे वरळी येथील पासपोर्ट कार्यालयासमोर मॉडर्न हॉटेलजवळ १७२ क्रमांकाच्या बसने प्रवास करत होते. त्याच वेळी तिथे भीषण बॉम्बस्फोट झाला. या घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या स्फोटात सुधीर यांच्या गालाला दुखापत झाली होती. त्या वेळी दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात प्राथमिक उपचार व ड्रेसिंग करून ते घरी परतले होते; मात्र, त्या स्फोटातील आरडीएक्समिश्रित धातूचा एक तुकडा त्यांच्या शरीरात आतच राहिला होता, याची त्यांना माहितीही नव्हती.
गेल्या ३३ वर्षांत सुधीर यांना या तुकड्याचा कोणताही त्रास जाणवला नाही; मात्र ब्रेनस्ट्रोकच्या निमित्ताने झालेल्या तपासणीत हा ऐतिहासिक पुरावा बाहेर आला. ११ सप्टेंबर रोजी हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. कुमार ऋषी यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून सुधीर यांच्या शरीरातील तो धातूचा तुकडा बाहेर काढला. सध्या हा तुकडा पुढील वैज्ञानिक संशोधन आणि तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूच्या दाढेतून बचावलेले सुधीर मोहिते तब्बल तीन दशकांनंतरही त्या घटनेची वेदनादायी निशाणी शरीरात बाळगून जगत होते, या घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह संगमेश्वर तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.