

rat13p12.jpg, rat13p13.jpg-
63695. 63696
रत्नागिरी : गणरायाच्या स्वागतासाठी आकर्षक पुष्पमाळांसाठी भाविक मोठ्या संख्येने बाजारपेठेत येत असल्याने त्यातून मोठी उलाढाल होते.
-rat13p14.jpg-
63697
सोमवारपासून साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवताना मुर्तीकार.
rat13p15.jpg-
63698
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला गावात येणारे चाकरमानी आणि स्थानिक ग्रामस्थ एकत्रितपणे गणेशमूर्ती घरी घेऊन आल्यानंतर वातावरण भक्तीमय होऊन जाते.
-rat13p16.jpg-
63699
भाविकांच्या घरी जाण्यासाठी सज्ज असलेल्या गणेशमूर्ती.
-rat13p19.jpg-
63702
लाखोंच्या संख्येने कोकण रेल्वेतून येणाऱ्या चाकरमान्यांमुळे गणेशोत्सवात कोकणातील अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते.
---------
इंट्रो
गणेशोत्सव हा कोकणसाठी केवळ धार्मिक सण नाही; तो माणसांना त्यांच्या मातीशी जोडणारा उत्सव आहे. मुंबई, पुणे आणि देश-परदेशात नोकरी व्यवसायासाठी गेलेला कोकणी माणूसही गणपतीच्या निमित्ताने मूळगावी परततो आणि त्यासोबत गावाचे अर्थचक्रही वेगाने फिरू लागते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गणेशोत्सवाची स्वतंत्र लोकपरंपरा आहे. गावागावात घरटी माणूस येत असल्याने कोकणात चैतन्य फुलते. गावाशी, लाल मातीशी नाळ घट्ट करणारा म्हणून गणेशोत्सवाचे आगळे महत्व आहे...!
- सचिन माळी, मंडणगड
-----------
गणेशोत्सवाने गावाशी, मातीशी नाळ अधिक घट्ट
कोकणात फुलते चैतन्य ; कलाना येतो बहर,अर्थचक्राला गती
गणपती आराधनेची परंपरा कोकणात पिढ्यानपिढ्या जपली जात आहे. आंबा, काजूसह पारंपरिक भातशेती करणारा कोकणी माणूस नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत रमलेला असला, तरीही गणेशोत्सवासाठी त्याची पावलं आपसूकच गावाकडे वळतात. गणेश आगमनापूर्वी गावातील घरात मुंबईकरांचे होणारे आगमन या उत्सवाची शान वाढवते. आजही गावातील घरात राहणारे नागरिक त्या मुंबईकराची प्रतीक्षा करताना दिसतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही ओढ आजही कायम आहे. दळणवळणाचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही चौदा ते पंधरा तास प्रवास करत मुंबईकर उत्सवाचा आनंद घेण्यासाठी दाखल होतात. वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर ते सहजरित्या मात करतात. सध्याच्या वाढत्या महागाईतही हा उत्साह कमी झालेला नाही. एकीकडे भक्तीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच दुसरीकडे हा उत्सव गणेशमूर्तींपासून मखरांपर्यंत, फुलांपासून विद्युत रोषणाईपर्यंत आणि ढोल-ताशांपासून वाहतुकीपर्यंत अनेक व्यवसायांना उभारी देणारा ठरत आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील अनेकांनी शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तींना प्राधान्य दिले आहे. यामधून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला जात आहे. रत्नागिरीत पारंपरिक वाद्यांची मागणी वाढल्यामुळे ढोल-ताशे, ढोलकी घडवणाऱ्या कारागिरांना अच्छे दिन आले आहेत. गणेशोत्सव हा केवळ श्रद्धेचा सण नसून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे मोठे अर्थचक्र यामागे कार्यरत आहे.
---------
मूर्तीकारांच्या हातात माती, नजरेसमोर परंपरा
कोकणातील मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्ती घडवण्याची कला अनेक घराण्यांनी पिढ्यानपिढ्या जपली आहे. आज शाडूची माती, कागदाचा लगदा आणि पर्यावरणपूरक साहित्य यांचा वापर वाढत असताना आकार, रंग आणि संकल्पनांमध्येही प्रयोग होत आहेत. चिपळूणच्या खांदाटपालीतील मूर्तीकार राजेश नरळकर यांनी तयार केलेली शाडूमातीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती यंदा अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विराजमान होणार आहे. कोकणच्या मातीतली कला सातासमुद्रापार पोहोचल्याचे हे उदाहरण तसेच रत्नागिरीतील गणेशगुळे येथील मूर्तीकार ज्ञानेश कोटकर यांनी साकारलेल्या वैविध्यपूर्ण मूर्तीदेखील परदेशात प्रतिष्ठापित केल्या जात आहेत. या परंपरेमुळे नवनवीन मूर्तीकारांनाही प्रेरणा मिळत आहे.
----------
परंपरेपासून ‘इको फ्रेंडली’पर्यंत
पूर्वी नदी, ओढे, विहिरी किंवा समुद्रकिनाऱ्यांवर विसर्जनाची प्रथा होती. आता जलप्रदुषणाचा प्रश्न गंभीर होत असल्याने शाडूमातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, निर्माल्य संकलन आणि कृत्रिम विसर्जन व्यवस्था यांना महत्त्व दिले जात आहे. प्रशासनासाठी यंदा विसर्जन, वाहतूक, कायदा-सुव्यवस्था, आपत्कालीन मदत आणि ध्वनीप्रदूषण नियंत्रण ही प्रमुख आव्हाने आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गणेशोत्सव बंदोबस्ताचा विशेष आढावा घेऊन मुंबई-गोवा महामार्ग तसेच प्रमुख विसर्जनस्थळांची पाहणी करण्यात येत आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सामाजिक एकजुटीचे आणि जनजागृतीचे स्वरूप दिले. आज त्या परंपरेत नवे विषय जोडले गेले आहेत. रक्तदान, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मदत, स्वच्छता, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन अशा उपक्रमांकडे मंडळांचा कल वाढत आहे. रत्नागिरीतील टिळक आळी गणेशोत्सव मंडळाचे यंदा १०१वे वर्ष असून, मंडळाने महाआरोग्य शिबिर, रक्तदान, डोळे, रक्त व हाडांची तपासणी असे उपक्रम आयोजित केले आहेत. चिपळूण येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक, क्रीडा आणि वैचारिक कार्यक्रमांची परंपरा पुढे नेली आहे. तर राजापूरमधील मंडळानेही आगळीवेगळी परंपरा राखली आहे.
----------
ढोलताशांचा नाद; पण शिस्तीची साथ
गणेशोत्सवातील पारंपरिक वाद्ये आजच्या तरुणाईला पुन्हा आकर्षित करत आहेत. ढोलताशा पथकांमध्ये मुलींचाही वाढता सहभाग, नियमित सराव आणि शिस्त हे उत्सवाचे नवे चित्र आहे. दुसरीकडे साउंड सिस्टीम, प्रचंड ध्वनी आणि लेझरच्या वापराबाबत ध्वनिप्रदुषणाचा प्रश्नही पुढे येतो म्हणूनच यंदाच्या उत्सवात ‘आवाज किती मोठा?’ यापेक्षा ‘उत्सव किती संस्कृतीपूर्ण?’ हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीत जाखडी, नमन आणि दशावतार यांना विशेष स्थान आहे. गणेशोत्सव आणि इतर सणांच्या निमित्ताने या लोककलांना आजही व्यासपीठ मिळते. जिल्हा प्रशासनाच्या सांस्कृतिक माहितीनुसार बाहेरगावी गेलेले नागरिक गणेशोत्सवासाठी गावाकडे परततात आणि या परंपरांमुळे स्थानिक सांस्कृतिक जीवन जिवंत राहते. आज फरक एवढाच, गावच्या चौकातील कार्यक्रमाचा व्हिडिओ काही क्षणांत सोशल मीडियावरून परदेशातील कोकणी माणसापर्यंत पोहोचतो. कलगीतुरा डबलबारी सामने सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत.
------------
मूर्ती, माध्यमे बदलली; भावना मात्र तीच
पूर्वी गणेश आगमनाची बातमी गावच्या चौकात पसरायची; आज ती व्हॉट्सॲप स्टेटस आणि इन्स्टाग्राम स्टोरीतून काही क्षणांत जगभर पोहोचते. पूर्वी भजनाच्या कॅसेट होत्या; आता यूट्यूबवरील गणेशगीते आहेत. पूर्वी साधा मखर होता; आता सामाजिक संदेश देणारे देखावे आहेत; मात्र बाप्पासमोर हात जोडताना शहरातील माणूस आणि गावातील माणूस, नवी पिढी आणि जुनी पिढी, देशातला आणि परदेशातील कोकणी सगळ्यांची भावना एकच आहे.स्थानिक रोजगार वाढवणारा, लोककला जपणारा, पर्यावरणाचे भान ठेवणारा, सामाजिक उपक्रमांना बळ देणारा आणि पुढच्या पिढीला परंपरेशी जोडणारा उत्सव उभा राहिला तरच कोकणचा गणपती आधुनिक काळातही आपली वेगळी ओळख टिकवेल. कारण, कोकणात फक्त गणपती घरी येत नाही तो गाव, माणसं, आठवणी, परंपरा आणि अर्थव्यवस्था सगळेच पुन्हा एकदा जागे करतो.
----------
गणपती सजावट स्पर्धा अन् पर्यावरणपूरक देखावे
गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून विविध संस्थांतर्फे गणेश सजावट स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. यातून ग्रामीण भागातही पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारे विविध देखावे साकार करणारे कलाकारही सज्ज झाले आहेत. चलतचित्र देखावे साकारण्याकडे अनेकांचा कल आहे. संतांच्या जीवनावरील चमत्कार व देखाव्यांचा यात अधिक समावेश आहे. पिंडी दर्शन धबधबा, निसर्ग देखावा, एसटी बस व कोकण रेल्वे, गणेशोत्सवामधील चुकीच्या पद्धती संस्कृती व पर्यावरण हानी, संत नामदेव देखावा, साईबाबा देखावा, शिवशंकर भोलेनाथ, विविध मंदिरांच्या प्रतिकृती असे देखावे साकारले जातात.
कोट 1
पिढ्यान्पिढ्या चालत आलेली मूर्तीकलेची परंपरा आजही जपताना भक्तांच्या आवडीनुसार बदल स्वीकारत आहोत. गणरायाच्या रूपात भक्तांना आपलेपणा जाणवणे, हाच आमच्या कलेचा खरा आनंद आहे.
- महेश भानसे, मूर्तीकार
कोट 2
भक्तांच्या मागणीनुसार मूर्तीचा आकार, रंग, डोळे, मुकुट आणि नक्षीकामातील बारकावे बदलावे लागतात. कच्च्या मूर्तीपासून अंतिम रूपापर्यंत दीड-दोन महिन्यांची मेहनत असते; त्या मूर्तीत भक्ताचे आपलेपण उतरले तेव्हाच मूर्ती खऱ्या अर्थाने पूर्ण होते.
- राजेश घडशी, मूर्तीकार
कोट 3
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता समाजातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि संस्कृती जपण्याचे माध्यम व्हावे यासाठी मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यावर आमचा भर आहे.
- विजय ऐणेकर
कोट 4
गाणी, रील्स आणि स्टोरीतून नवा गणपती उत्सव समोर येत आहे. आज गणपतीची आरती केवळ घरात ऐकू येत नाही; ती यूट्यूबवर जाते. गावातील सजावट केवळ गावापुरती राहत नाही ती इन्स्टाग्रामवर पोहोचते. बाप्पाच्या आगमनाची स्टोरी, विसर्जनाची रील आणि पारंपरिक गाण्यांचे डिजिटल रेकॉर्डिंग यामुळे कोकणचा उत्सव जगभरातील कोकणी माणसापर्यंत पोहोचतो.
- जय निवाते, कलावंत
----------
चौकट
गौरीचे हौसे
गणरायांच्या पाठोपाठ ज्येष्ठागौर व कनिष्ठा गौर प्रत्येक घरात मोठ्या उत्साहात आगमनकर्त्या होतात. या दोन्ही गौरींचे आगमन हे प्रत्येक घरातील सवाष्ण स्त्रीसाठी एक आपुलकीचं लेणं असतं. जेव्हा या गौरींच आगमन पूर्वा नक्षत्र असताना होते तेव्हाच्या वर्षी साजरे केले जातात ते गौरींचे हौसे. नवीनच लग्न झालेल्या सासुरवाशिणीसाठी हा एक अपूर्व सोहळा असतो. त्या दिवशी दोन सुपांमध्ये, यात एक आकाराने मोठे असलेले सूप तर आकाराने लहान असलेले सुपले असते, काकडी, पडवळ, दोडका, घोसाळे अशा फळभाज्या, पाच प्रकारची फळे, नारळ किंवा खोबर्याची वाटी आणि विडे ठेवले जातात. या विड्यांपैकी पहिल्यांदा घरच्या देवाला विडा ठेवून मग मान मिळतो तो नवीन नवरदेवांना. त्यानंतर घरातील ज्येष्ठांना विडे देऊन वाडीतील ठरलेल्या घरांमध्ये विडे दिले जातात. नंतर माहेरी जाताना पतीराजांना सोबत घेऊन निघालेली नवरी अनावर ओढीने धावत असते. माहेरी आलेल्या या नवरीचं थाटात स्वागत केलं जातं. माहेरच्या मंडळींना विडे दिल्यानंतर माहेरवाशिणीची पाठवणी करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.