

‘चिपळूण अर्बन’चा राज्यात तिसरा क्रमांक
चिपळूण : चिपळूण अर्बन को-ऑप. बँक २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी राज्यातून तृतीय क्रमांकाचा ‘सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार’ मिळाला. महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांच्या कामगिरीची दखल घेऊन फेडरेशनतर्फे दरवर्षी विविध गटांत सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार दिले जातात. ३०१ ते ५०० कोटी रुपये ठेवी असलेल्या बँकांच्या गटात चिपळूण अर्बन बँकेने राज्यातून तृतीय क्रमांक पटकावला. शनिवारी (ता. १२) छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात बँकेचे अध्यक्ष मोहनशेठ मिरगल, संचालक समीर जनावलकर, रत्नदीप देवळेकर व समीर टाकळे यांनी पुरस्कार स्वीकारला. फेडरेशनचे अध्यक्ष सीए अजय ब्रम्हेचा, उपाध्यक्षा वैशाली आव्हाडे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त वंदन
रत्नागिरी ः महानुभाव पंथाचे प्रवर्तक, थोर समाजसुधारक व तत्त्वज्ञ भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले. १२ व्या शतकात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडवून आणणारे भगवान श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म गुजरातमधील भडोच (भरूच) नगरी येथे विशाळदेव व माल्हणदेवी यांच्या पोटी झाला. त्यांनी तत्कालीन समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा, कर्मकांड व सामाजिक विषमता यांना कडाडून विरोध करत मानवतेवर आधारित विचारांचा प्रसार केला. महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानून त्यांनी धर्म, समाज व अध्यात्म क्षेत्रात मोलाचे कार्य केले.
घाणेखुंट येथे पोषण जनजागृती
चिपळूण ः राष्ट्रीय पोषण सप्ताह निमित्त एम. ई. एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, घाणेखुंट-लोटे येथील बाल आरोग्य परिचर्या विभागातर्फे घाणेखुंट येथील अंगणवाडीत पोषण जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अंगणवाडीतील पाच वर्षांखालील बालकांच्या मातांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. लहान मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी पोषणाचे महत्त्व, संतुलित व पौष्टिक आहार, बालकांच्या पोषणविषयक गरजा, पोषणाच्या कमतरतेमुळे होणारे आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याबाबत माता-पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या स्थानिक व पौष्टिक खाद्यपदार्थांचा दैनंदिन आहारात कसा समावेश करता येईल, याबाबतही माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.