

(गणपतीचा छोटा फोटो वापरा)
आठवणीतील गणेशोत्सव----------लोगो
(१४ सप्टेंबर टुडे ३)
गणेशोत्सवाचा रंगच न्यारा
गणेशोत्सव भाद्रपद महिन्यात येणारा सण; पण आमच्याकडे श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी त्याची चाहूल लागायची. कारण या दिवशी आल्हाददायी वातावरणात स्त्रियांच्या फुगड्यांची गाणी आणि त्यातील उत्साह यामुळे वाडीत चैतन्य फुलायचे. श्रावणात पुढे नागपंचमी, नारळी पौर्णिमा आणि सोमवार-शनिवार जमेल तसे रात्री फुगडी, टिपऱ्यांचा नाद घुमत राही. मग आमच्या भंड्यादादाला नाचाचे भरते येई. ‘आबा, नाच कधी काढूया? अरे, पोरांची प्रॅक्टिस होणार कधी? ढोलकी, चाळ तरी बघा!’
-सुहास वाडेकर, हर्चे, लांजा
भंड्यादादाची रोजची आळवणी ऐकून शेवटी कृष्णा आबांचा नाईलाज होई. बुवा, संतूदादा आणि अन्य पोरांशी बोलून शेवटी सुधीरदादाच्या घरी खर्डी, धुमा आणि चाळ यांचा लयबद्ध आवाज घुमायला लागे. पुढे किमान महिनाभर रिहर्सल चाले. आमचे बंधू पांड्यादादा, राजा, लीलाधर, अमित, मनोहर, जगदीश, विजूदादा सर्व मिळून जाखडी नृत्याची सलामी, पाऊंडी, विविध चाली, गाणी यांचा तासनतास सराव करीत असू. यात संतूदादा आमच्या आडव्या नाचाचे युवा शक्तिवाले शाहीर. गुरु तानू शाहीर यांची पुराणातील गाणी, त्यातील आशय घेऊन नव्या गाण्याची रचना, काही गाण्यांना चित्रपटातील गाण्यांच्या चाली लावून ती गायची, स्वतः नाचायचे आणि आमच्याकडून करून घ्यायचे, यात संतूदादाचा हात धरणारा कोणी नाही.
पुढे पुढे याच तालमीत आमचे कनिष्ठ बंधू सुभाष, आशिष, किरण, विश्वभर, प्रविण, संदेश, तुषार, अभिषेक, समीर, जयेश, विशाल, रुपेश, संतोष अशी जाखडीची दुसरी फळी तयार झाली.
‘एक लाजरानं साजरा मुखडा...’ या गाण्याच्या चालीवर,
‘तुम्ही तुरेवाले बुवा, कुठे लावला दिवा र,
आम्ही शक्तीवाले बुवा, उडवू तुमचा धुव्वा र...’
हे म्हणताना आणि नाचताना चार हत्तीचे बळ अंगात संचारायचे. तसा वाडेकर कुटुंबीयांचा आमचा सार्वजनिक गणपती. मात्र घरात गणपती नसला तरी उत्साह कधीच कमी नव्हता. वाडेकर परिवारात पूर्वापार फक्त दोनच गणपती होते. सार्वजनिक गणरायाची प्रतिष्ठापना विलास वासुदेव वाडेकर यांच्या घरी प्रथेप्रमाणे आजही केली जाते. मूळ देवही तिथेच आहे. गणपती जवळ आले की देवघरात सर्वजण एकत्र येऊन गणपतीची आरास करत. यामध्ये मंडपीची सजावट लक्षवेधी असे. गणपती आगमनाच्या दिवशी आम्ही शेळवीवाडीत गिरकर यांच्या घरी मूर्ती आणायला जायचो. दोन गणपती आणि लहानथोर पन्नासएक माणसांचा गोतावळा. सोबत वाडीतील आणखी पाच-सात गणपती. ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत मोठ्या दिमाखात आमचे गणपती येत.
पहिल्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर सुखाचे गाऱ्हाणे घातले जायचे. दुपारी नैवेद्य झाला की आम्ही कसून सराव केलेले जाखडीवाले बरेचदा दाभिळ-आंबेरेकडे रवाना व्हायचो. मग दुसऱ्या दिवसापासून अगदी विसर्जनापर्यंत डोर्ले आणि तिथून पुढे गावात घराघरात नाचायला जायचो.
अगदी सुरुवातीला विशेष ड्रेस नव्हता; पण बऱ्यापैकी रक्कम झाल्यावर आम्ही नाचगड्यांना सुरुवातीला ‘मैने प्यार किया’च्या म्हणजे पिवळ्या रंगाच्या बनियन घेतल्या होत्या. पुढे दोन-तीन वर्षे पैसे गोळा करून जाखडीसाठीचे प्रसिद्ध झगमगीत झगे आणि पायजमे घेतले. त्यावर पैसे वसूल होऊन पार कपडे फाटेपर्यंत आम्ही नाचलो. दिवसभर नाचूनदेखील सायंकाळी नित्यनेमाने केल्या जाणाऱ्या आरतींना आम्ही कायमच हजर असू. आजदेखील गणपतीची आरती म्हणजे एका घरात किमान पाऊण तास, असा आमचा रिवाज. वाडीत गणपती मोजून नऊ; पण आरती किमान चार तास.
पूर्वी आमचे चुलते दाजीआण्णा मुंबईहून गणपतीला आले की, एका गणपतीला किमान तासभर आरती व्हायची. आम्ही लहान असताना अण्णा आरती कधी संपवणार, याची वाट पाहत नुसत्याच टाळ्या पिटत असायचो. आरतीचे पुस्तक उघडले तर त्यात त्या आरती नसत. अण्णांच्या जवळपास सत्तरएक आरती आजही तोंडपाठ आहेत. परब्या आबांची ढोलकी, विलास आबा आणि बबनदादांची चंचीची साथ यामुळे आरती अशा काही रंगत की, काही बोलायचे काम नसे. त्यात भाई ((कै.) बाजी संभू वाडेकर गुरुजी), संजय आबा, वसंत आण्णा जोडीला असले की आरतीत अजून बहार येई.
एका वर्षी तर आम्हा तरळ-वाडेकर भावकीला सुतक असल्याने आरती ओवाळणीवाला आमचा हक्काचा पांड्यादादा शिवगण गणपतीपुढे आरतीचे ताट ठेवून वैतागून तसाच घरी गेला होता. आरतीच्या वेळी आमचे मार्गदर्शक संतूदादा मात्र गावकऱ्यांची बाजू धरून असे.
पुढे एका वर्षी अण्णांना लाकडी कॉटवर बसवून, त्यांनी आरती तोंडी सांगून मी एका डायरीत सर्व आरती उतरवून घेतल्या आणि आम्ही खऱ्या अर्थाने आमची फळी तयार केली. अण्णांसारख्या पाठ झाल्या नाहीत; पण किशोर, संदीप, विजय, प्रितम, पंकज, कल्पेश आता नव्या पिढीत आमचे चिरंजीव आर्यन, सोहम, शुभम, निखिल, सिद्धांत, साई अण्णांचा वारसा पुढे घेऊन चालले आहेत. अण्णा, व्यंकोजी आप्पा, वासुकाका तरळ, प्रकाशदादांची सासूबाई, ताईकाकू, मोठीआई, सुळसुळी आजी, पार्वती मावशी, सुगुताई आणि गणपतीची आरती तसेच फुगड्या हे न विसरण्यासारखे समीकरण आहे.
गौरी आवाहनावेळी तीळ, हळद, तिरडा यांची रोपे रोवळीत घेऊन पऱ्यावरून वाजतगाजत अत्यंत श्रद्धेने सुवासिनी गौरी घरी आणतात. याच दिवशी मुचकुंदीपलीकडे बेनगी गावात प्रतिवर्षी जाखडीची डबलबारी असे. त्यादिवशी आम्ही दुपारपर्यंत शेळवीवाडीत नाचून, त्याच पैशातून होडीने डबलबारी बघायला हमखास जायचो.
संतूदादाच्या आखणीप्रमाणे आपल्यापेक्षा त्यांच्या नाचात नवीन काय, याकडे आम्ही खास लक्ष ठेवायचो. त्याच रात्री त्याचा सराव करायचो आणि गौरी पूजनाच्या दिवशी त्या सर्व चाली मारायचो. एका इशाऱ्यावर खाणाखुणांनी चालणारे जाखडी नृत्य करताना कशाचेच भान उरायचे नाही. आता आवडीने एक दिवस सर्व सहभागी होऊन नाच काढतो; पण विशेष असते ते गणपतदादा, जनूदादा, परशुराम मेस्त्री, विष्णूनाना, तानूनाना, आत्माराम आप्पा, जानूनाना, अनंतनाना, सुरेशदादा, शिवरामदादा, तोस्कर भावोजी, नितीन यांनी मिळून काढलेला उभा नाच!
‘राम लंकेची सांगतो कथा,
कवीच्या सुता बस खाली,
सांगतो तुला गुरुघरच्या चाली,
सीतामाई वनवासाला गेली रे राम, राम...’
खड्या आवाजात सुरू झाले की आमची आई सुवर्णा वाडेकर आम्हाला, ‘पोरांनो, म्हाताऱ्यांनी नाच काढलानी बघा, तुम्ही काय करताय?’ असे अगदी हटकून म्हणणार.
‘कुंडा-मांडा खाईन,
दीड दिवस राहीन,
पण कोकणात माहेरी जाईन...’
अशा हट्टाने आलेल्या गौरीला कुंडा आणि तांदूळमिश्रित भाकरी, पालेभाजी, दही असा पहिला नैवेद्य विलास तानू वाडेकर यांच्याकडचा असतो. त्यावेळी नववधूच्या ओवशात खास करून फळे, खोबरे, वडे, काकड्या अशी फळफळावळ असे. आरत्या, फुगड्या, जाखडी यांनी जेव्हा गौरी जागवत तेव्हा नव्या ओवशाचे भरलेले सूप सकाळी हमखास रिकामे असे. फळफळावळ स्पेशालिस्ट रवीदादा आम्हा मुलांच्या हौसेसाठी वय विसरून अनेकदा लहान झाला. जागरणाच्या दिवशी उमेशकडील चण्याची झणझणीत उसळ, सुधीरदादाकडे रात्री बारानंतर पत्त्याचे डाव आणि काकड्यांचा चुराडा सदैव लक्षात आहे. या दिवसाची आठवण म्हणजे पूर्वी सुधीरदादाकडचा गणपती वाजतगाजत आमच्या सार्वजनिक गणपतीशेजारी आणून बसवत. गौरीच्या पदराखाली आमचे दोन्ही गणपती बसले पाहिजेत, अशी त्यावेळी भावना होती. आता ती प्रथा आम्ही बंद केली; पण एकाच मखरात गौरी आणि दोन्ही गणपतींच्या शिरावरील तिचा पदर हे दृश्य अतिशय विलोभनीय असे. गौरी नैवेद्यासाठी मांसाहार आणि आपल्या मुलाबाळांना भरपूर मटण मिळावे यासाठी आयांनी शेतात वाटे घालायची प्रथाही राहणीमान आणि आधुनिक विचारांमुळे मागे पडली आहे. नाहीतर किमान तीन महिने बकरे मोठे करण्यात एक वेगळीच मजा असायची. विसर्जनाच्या दिवशी नदीकडे जाणारी वाट सकाळी साफ केली जाई. एकमेकांना मदत करून मुचकुंदीत विसर्जन करून नदीत मनसोक्त डुंबणे, काठावरून वाडीवाल्यांचे ‘चला, बाहेर पडा!’ म्हणून दरडावणे, यासह क्वचित एखाद्या वर्षी विसर्जनावेळी झालेले अपघात, गणेशोत्सवावर आलेले विरजण अविस्मरणीयच आहे. पण शेवटी सुख आणि दुःख यांची पेरणी त्या विघ्नहर्त्याकडेच आहे, नाही का?
गणपती बाप्पा मोरया...!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.