जिल्ह्यातील आंबा निर्यातीला मिळणार चालना

जिल्ह्यातील आंबा निर्यातीला मिळणार चालना
Published on

26O64119
एआय चित्र

आंबा निर्यातीला मिळणार चालना
लोकप्रतिनिधींच्या मंडळाची वाशी केंद्राला भेट ; निर्यातक्षम हापूससाठी पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १५ ः आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे आणि आंबा निर्यातीच्या प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेणे, या उद्देशाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मंडळाने वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या आंबा निर्यात केंद्राला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी निर्यातीच्या विविध टप्प्यांची पाहणी करून संबंधित अधिकारी व तज्ज्ञांशी चर्चा केली.
जिल्हा परिषदेचे कृषी सभापती महेश नाटेकर, गुहागर पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, प्रवीण पांचाळ, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, संगमेश्वर पंचायत समिती सभापती शर्वरी वेळ्ळे, चिपळूण पंचायत समिती सभापती सूर्यकांत खेतले, दापोलीचे कृषी सभापती उन्मेश राजे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद निवळकर, कृषी अधिकारी अभिजित गडदे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी प्रतिनिधी या अभ्यास दौऱ्यात उपस्थित होते. या वेळी पदाधिकाऱ्यांनी आंब्याची प्रतवारी, स्वच्छता, पॅकिंग आणि साठवणूक या प्रक्रियांची प्रत्यक्ष पाहणी केली. परदेशात आंबा पाठवण्यापूर्वी त्यावर केली जाणारी ‘व्हेपर हिट ट्रीटमेंट’ आणि ‘इरॅडिएशन’ या तांत्रिक प्रक्रियेची माहिती तज्ज्ञांकडून घेतली. तसेच, निर्यात केंद्राचे व्यवस्थापक अनिमेष पाटील व त्यांच्या पथकासोबत आयोजित बैठकीत युरोप व आखाती देशांतील आंब्याची मागणी, निर्यातीचे निकष आणि शेतकरीबंधूंना थेट परदेशी बाजारपेठ मिळवून देण्याबाबत सविस्तर मंथन झाले.
---
कोट
वाशी येथील निर्यात केंद्राची कार्यप्रणाली अत्यंत अद्ययावत आहे. येथील अभ्यासाच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी ‘मॅंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी लवकरच विशेष मार्गदर्शन मोहीम राबवली जाईल. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादनावर भर दिल्यास त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल.

- महेश नाटेकर, कृषी सभापती, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com