ओबीसी चळवळ गावागावात पोचवणार

ओबीसी चळवळ गावागावात पोचवणार
Published on

ओबीसी चळवळ गावागावात पोचवणार
शरदचंद्र गीते ः ‘ओबीसी जनमोर्चा’चा कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः रत्नागिरी जिल्ह्यातील बारा बलुतेदार व अठरा अलुतेदार ओबीसी समाजाला संघटित करून त्यांच्या न्याय्य हक्क आणि अधिकारांबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी ‘ओबीसी जनमोर्चा’च्यावतीने विशेष धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावात व पंचायत समिती गणात ओबीसी चळवळ पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याची माहिती ओबीसी जनमोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तालुक्यातील प्रत्येक पंचायत समिती गणनिहाय बैठका घेऊन सर्वसमावेशक स्थानिक कमिट्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करत प्रत्येक गणात प्रचार व प्रसिद्धी केली जात आहे. ओबीसी आरक्षण, संविधानिक अधिकार, जातनिहाय जनगणना तसेच ‘महाज्योती’, ‘बार्टी’ व ‘सारथी’ यांसारख्या महामंडळांच्या बजेटमधील वस्तुस्थिती या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. ५० ते १०० किंवा त्याहून अधिक ओबीसी बांधव एकत्र आल्यास, पूर्वसूचनेनुसार जिल्हा पदाधिकाऱ्यांच्यावतीने त्या ठिकाणी सविस्तर प्रबोधन वर्ग आयोजित केले जातील. विविध राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या ओबीसी पदाधिकाऱ्यांनी ‘प्रथम ओबीसी’ या नात्याने या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी व्हावे किंवा आपल्या राजकीय वजनाचा वापर करून ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
ओबीसी राजा जागा हो ची साद
रत्नागिरी जिल्ह्यात बहुसंख्य असूनही ओबीसी समाज वर्षानुवर्षे केवळ मागणीकर्त्याच्या भूमिकेत राहिला आहे. ही परिस्थिती बदलून जिल्ह्याला ओबीसी चळवळीचा एक आदर्श वस्तुपाठ बनवायचा आहे. भविष्याची चिंता असणारा प्रत्येक ओबीसी बांधव मतभेद विसरून या संघर्षात मोठ्या ताकदीने सहभागी होईल, असा विश्वास व्यक्त करत गीते यांनी ओबीसी राजा जागा हो, संघर्षाचा धागा हो! असा नारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com