गणेशोत्सवात घुमतेय ‘आरती समतेची’

गणेशोत्सवात घुमतेय ‘आरती समतेची’
Published on

हेदलीत ‘आरती समतेची’चा जागर

समता, बंधुता अन् वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १५ ः खेड तालुक्यातील हेदली हे पुरोगामी विचारांची परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते. यंदाच्या गणेशोत्सवात गावात ‘आरती समतेची’ या अत्यंत अनोख्या उपक्रमातून समता, बंधुता, मानवतावाद, पर्यावरण रक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.
उत्सवातील पारंपरिक आरतीला सामाजिक प्रबोधनाची जोड देत समाजात एकोपा नांदावा, जातपात विसरून सर्वांनी देशाच्या प्रगतीसाठी एकत्र यावे, असा संदेश या आरतीद्वारे दिला जात आहे. तसेच पर्यावरणाचे रक्षण, समाजाप्रति बांधिलकी आणि प्रत्येक नागरिकाने विवेकवादी दृष्टिकोन स्वीकारावा यावर विशेष भर देण्यात आला आहे. ‘आरती समतेची’ ही प्रसिद्ध ‘येई वो विठ्ठले माझे माऊली ये’ या चालीवर आधारित असून, ती विविधतेने नटलेल्या भारतात एकजुटीने राहण्याची प्रेरणा देते. संत-महात्म्यांनी दिलेला मानवतेचा विचार, महापुरुषांचे चरित्र वाचन, समता आणि शांततेचा संदेश, शिक्षणातून विवेकबुद्धी विकसित करणे तसेच जन्मापेक्षा विचार, आचार आणि कर्तृत्वाला महत्त्व देणे, अशा विविध मूल्यांची मांडणी या आरतीतून करण्यात आली आहे. गणेशोत्सवात मनोरंजनासोबतच कोकणची पारंपरिक लोककला असलेल्या जाखडी नृत्याच्या माध्यमातूनही प्रबोधन केले जात आहे. शाहीर सचिन गोवळकर, सदानंद शिगवण, ढोलकीपटू रूपेश चिनकटे आणि मधुकर मेंगडे हे जाखडीच्या माध्यमातून प्रबोधनात्मक गीते सादर करून महापुरुषांचे विचार जनमानसात रुजवत आहेत.

उत्सवातून सामाजिक परिवर्तन
‘आरती समतेची’ या अनोख्या उपक्रमातून हा उत्सव केवळ धार्मिक किंवा मनोरंजनापुरता मर्यादित न राहता विचार, विवेक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम ठरत असल्याचे चित्र हेदली गावात पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com