

मोकाट कुत्र्यांचा तरुणावर हल्ला
रत्नागिरीत भीतीचे वातावरण ; कार्यवाहीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः शहरातील कोकणनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला आहे. या हिंसक झालेल्या कुत्र्यांनी गेल्या अवघ्या आठवडाभरात दोन लहान मुलांसह एका तरुणावर हल्ला करून गंभीर दुखापत केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. नगरपालिकेचा आरोग्यविभाग या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोकणनगर आणि परिसरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या अनियंत्रितपणे वाढत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांचा, विशेषतः लहान मुले व वृद्धांचा हे कुत्रे अचानक पाठलाग करत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. रत्नागिरी पालिकेच्यावतीने काही महिन्यांपूर्वी मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीची मोहीम राबवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र, प्रत्यक्षात या मोहिमेचा कोणताही सकारात्मक परिणाम कोकणनगरात दिसून आलेला नाही. उलटपक्षी कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. पालिकेची नसबंदी मोहीम केवळ कागदावरच राहिली आहे का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
परिसरातील कुत्रे अचानक हिंसक होण्यामागे स्थानिक चिकनसेंटर चालक कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. दुकानांमधील उरलेले मांस आणि टाकाऊ भाग उघड्यावर फेकून दिले जात असल्याने ते खाण्यासाठी कुत्र्यांमध्ये झुंज लागते. यामुळेच हे कुत्रे अधिक आक्रमक आणि हिंसक बनत चालले आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
------
तातडीने बंदोबस्त करा
आठवडाभरात तिघांना चावा घेण्याच्या घटनेनंतर आता स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून, रत्नागिरी पालिकेने या मोकाट व हिंसक कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा तसेच उघड्यावर मांस कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.