

बिजघर शाळेत ‘रानभाज्या महोत्सव’
खेड, ता. १६ ः सध्या फास्टफूडच्या जमान्यात नव्या पिढीला पौष्टिक आहाराची ओळख व्हावी, या उदात्त हेतूने जिल्हा परिषद शाळा बिजघर येथे नुकताच ‘रानभाज्या महोत्सव’ मोठ्या उत्साहात झाला. या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले ते रानभाज्यांचे प्रदर्शन. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने परिसरातील जंगल आणि माळरानावरून टाकळा, कुर्डू, फोडशी, कर्टोली, भारंगी, आघाडा आणि गुळवेलीसारख्या बहुगुणी रानभाज्या गोळा करून प्रदर्शनात अतिशय सुंदररित्या मांडल्या होत्या. केवळ भाज्या मांडून न ठेवता प्रत्येक रानभाजीचे स्थानिक नाव, तिचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी होणारे फायदे याबद्दल सविस्तर माहिती देणारे आकर्षक तक्ते विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले होते. महोत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ग्रामस्थांच्या आणि शिक्षकांच्या मदतीने या रानभाज्यांपासून बनवलेल्या पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांची उपस्थित सर्वांना या नैसर्गिक मेजवानीची चव चाखायला मिळाली. पालकांना रानभाज्यांचे आहारातील महत्त्व सविस्तर समजावून सांगितले. या वेळी माजी सरपंच शुभांगी भोसले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा आकांक्षा जंगम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
---
अनंत देवळेकर यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार
खेड, ता. १६ ः रत्नागिरी नगरपालिकेच्या शाळा क्र. १३ मध्ये कार्यरत असलेले मूळचे खेड येथील रहिवासी शिक्षक अनंत देवळेकर यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग विद्यालयात आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर येथील आविष्कार फाउंडेशनच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेने कार्य करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे या वेळी अधोरेखित करण्यात आले. या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यकार कुराडे, आविष्कार फाउंडेशनचे सर्वेसर्वा संजय पवार तसेच आविष्कार फाउंडेशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.