शिक्षणसेवकांचे समुपदेशन 22 रोजी रत्नागिरीत

शिक्षणसेवकांचे समुपदेशन 22 रोजी रत्नागिरीत
Published on

शिक्षणसेवकांचे मंगळवारी समुपदेशन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत ‘पवित्र प्रणाली’द्वारे निवड झालेल्या शिक्षणसेवक उमेदवारांचे समुपदेशन २२ रोजी आयोजित केले आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनीषा जगदाळे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, हे समुपदेशन लोकनेते कै. शामराव पेजे सभागृहात सकाळी ८.३० वाजता सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यातील भरतीसाठी ४७८ शिक्षणसेवक पात्र ठरले आहेत.
समुपदेशन प्रक्रियेसाठी सत्रांनुसार वेळापत्रक निश्चित केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवड झालेले उपशिक्षक व पदवीधर गणित व विज्ञानचे उमेदवार तसेच मराठी माध्यमातील पदवीधर दिव्यांग, महिला व पुरुष विज्ञान किंवा गणित उमेदवारांचे समुपदेशन सकाळी ९ ते दुपारी १२ या पहिल्या सत्रात होईल. दुपारी १२ ते १ या वेळेत उर्दू माध्यमातील पदवीधर व उपशिक्षक उमेदवारांचे (दिव्यांग, महिला व पुरुष) समुपदेशन होईल. यानंतर दुपारी ३ ते सायंकाळी ५ या सत्रात मराठी माध्यमातील उपशिक्षक पदासाठी निवड झालेल्या दिव्यांग, महिला व पुरुष उमेदवारांची प्रक्रिया पार पडणार आहे.
---
उमेदवारांची पडताळणी
प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व खेळाडू या समांतर आरक्षणातून निवड झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणी होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती दिली जाईल. तसेच टीईटी गैरप्रकारासंबंधी उमेदवारांचा चारित्र्य पडताळणी दाखला गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच नियुक्तीचे आदेश दिले जातील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवित्र प्रणालीद्वारे निवड झालेल्या सर्व उमेदवारांनी दिलेल्या वेळेत आणि ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com