

rat१७p११.jpg-
26O64499
चिपळूण ः भाजीमंडईच्या मागील बाजूस गौरीपूजनासाठी सूप तयार करण्याचे काम सुरू असून, खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
----
सुपांच्या मागणीने बुरूड व्यावसायिकांना दिलासा
आज गौरीपूजन; चिपळूण परिसरात ८० ते १८० रुपये दर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः सणासुदीच्या काळात पारंपरिक वस्तूंना असलेली मागणी बुरूड व्यावसायिकांसाठी यंदा चांगली संधी ठरली आहे. गणेशोत्सवातील गौरीपूजनासाठी लागणाऱ्या बांबूच्या सुपांना मागणी वाढल्याने चिपळूणच्या भाजीमंडईच्या मागील बाजूस बुरूड व्यावसायिकांच्या हातांना काम मिळाले असून, सुपे तयार करण्याची लगबग सुरू आहे. तयार सुपांच्या खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी होत असल्याने बुरूड व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
बांबू कापणे, त्याच्या पट्ट्या तयार करणे आणि त्यापासून विविध आकारांची सुपे विणणे, अशी कामे सध्या वेगाने सुरू आहेत. स्थानिक बुरूड व्यावसायिक हाताने सुपे तयार करत असून, आकार व नक्षीनुसार त्यांची विक्री केली जात आहे. यंदा मोठ्या आकाराच्या सुपांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सुपांचे दर साधारण १०० ते १८० रुपये तर लहान सुपे ८० ते १०० रुपये दराने विकली जात आहेत. आकर्षक वेणीच्या नक्षीची सुपे २०० ते ३०० रुपये दराने उपलब्ध आहेत. सुपांसोबत सुपल्या तसेच बांबूपासून तयार केलेल्या अन्य पारंपरिक वस्तूंनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.
----
गौरीपूजनात सुपाला मान
कोकणातील गौरीपूजनामध्ये सुपाला विशेष महत्त्व आहे. गौरीच्या पूजेसाठी विविध प्रकारचे धान्य, फळे व अन्य साहित्य सुपामध्ये मांडले जाते. तसेच गौरीपूजनानिमित्त नवीन सुनेला किंवा घरातील महिलांना सूप देण्याची परंपराही अनेक कुटुंबांत आजही जपली जाते. त्यामुळे गौरीच्या आगमनापूर्वी सुपांच्या मागणीत दरवर्षी वाढ होत असते.
---
मागणी कायम
गौरीपूजनाचा दिवस जवळ येत असल्याने चिपळूण शहरातील बाजारपेठेत महिलांची वर्दळ वाढली आहे. तयार वस्तू विकण्याबरोबरच स्थानिक पातळीवर सूप तयार करण्याच्या व्यवसायाला मिळालेली ही चालना बुरूड व्यावसायिकांसाठी महत्त्वाची ठरत आहे. आधुनिक वस्तूंचा वापर वाढला असला तरी गौरीपूजनाच्या निमित्ताने बांबूच्या पारंपरिक सुपांची मागणी कायम असल्याचे चित्र चिपळुणात पाहायला मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.