

- rat१७p६.jpg-
26O64492
रत्नागिरी ः तालुक्यात भातरोपांना लोंब्या दिसू लागल्या आहेत.
- rat१७p१६.jpg-
26O64571
राजापूर ः पाण्याअभावी पिवळी पडलेली भातरोपं.
------
परतीच्या पावसाचे संकेत; भातशेती धोक्यात
पाण्याचा तुटवडा; रोपं पिवळी पडली, उत्पादनावर परिणाम शक्य
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः प्रशांत महासागरातील ‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण असमान राहिल्याने रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणातील भात उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हवामानखात्याने १९ सप्टेंबरपासून नैऋत्य मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. उशिरा झालेल्या लावण्यांमुळे आणि भातपीक पूर्णपणे पसवण्यापूर्वीच दाणे भरणे किंवा फुलोरा येण्यापूर्वीच पाऊस गायब होण्याचे संकेत असल्याने जिल्ह्यातील विशेषतः निमगरव्या आणि गरव्या (महान) भातशेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात हे क्षेत्र ६० टक्क्यांहून अधिक आहे.
जिल्ह्यात जून २०२६ ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण २६३४.४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण सरासरीच्या तुलनेत ८८ टक्के पाऊस झाले आहे. चालू वर्षी खरिप हंगामात रत्नागिरी जिल्ह्यात भात व नाचणीची सुमारे ५३ हजार ६२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे; मात्र, सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि अलनिनोचे संकट असल्यामुळे पिकांना पावसाचा ताण बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सद्यःस्थितीत बहुतांश भागात वेळेत लागवड केलेल्या हळव्या जातींच्या म्हणजेच रत्नागिरी १, रत्नागिरी २४ व इतर वाणाच्या लोंबी भरल्या असून, त्या १५ ऑक्टोबरपर्यंत काढणीला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जातींवर पावसाच्या ताणाचा फारसा परिणाम होणार नाही; मात्र, उशिरा लागवड केलेल्या हळव्या जातींना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जूनच्या सुरुवातीला साधारण ८ तारखेच्या आसपास पेरणी झालेली १० ते १२ टक्के हळवी भातपिके सध्या परिपक्व किंवा कापणीच्या टप्प्यात असून, ती या पावसाच्या खंडावर मात करून सुरक्षित राहिली आहेत; मात्र, जिल्ह्यातील ६० टक्क्यांहून अधिक भाग व्यापणाऱ्या निमगरव्या व गरव्या (महान) जातींवर पावसाच्या तुटवड्याचा मोठा ताण येत आहे. मॉन्सून उशिरा सक्रिय झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत लावण्या १५ ते २० दिवस उशिरा झाल्या. परिणामी, भातपीक पसवण्याचा कालावधी पुढे सरकला असून, याच नाजूक टप्प्यावर पाऊस लांबल्याने पिकाचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. सखल भागातील शेतीची स्थिती काहीशी स्थिर असली तरी वरकस किंवा उंच भागातील भातखाचरांमध्ये पाण्याचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. जमिनीला भेगा पडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
दरम्यान, सध्या गणेशोत्सव सुरू असून, गौरी आगमनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा तालुक्याच्या काही भागात पावसाचे आगमन झाले होते; मात्र जिल्ह्याच्या उत्तर भागात दापोली, खेड, मंडणगड, गुहागर, चिपळूण तालुक्यात पाऊस नव्हता. त्यामुळे जिथे पाऊस पडलेला आहे अशा महसुली मंडळातील भातशेतीला संजीवनी मिळेल; परंतु पावसावर अवलंबून असलेली वरकस जमिनीवरील भातशेती संकटात सापडू शकते.
---
भातशेतीवर हे होतील परिणाम
* दुपारी पडणाऱ्या कडक उन्हामुळे करप्याचे सावट
* प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे ‘निळ्या भुंगेऱ्याचा’ प्रादुर्भाव वाढू शकतो
* पावसाच्या या अनियमिततेमुळे भात आणि तांदूळ उत्पादनात घट शक्य
कृषी विभागाचे मार्गदर्शन
* जमिनीला भेगा पडण्यापूर्वी शेतकऱ्यांनी स्थानिक स्रोतांतून सिंचनाची सोय करावी
* भातखाचरांमध्ये पाणी टिकवून ठेवावे
* निळ्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी
-----
कोट १
खरीप हंगामातील पिकांचे संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या सल्ल्यानुसार योग्य नियोजन करा. कृषी विभागामार्फत गावपातळीवर शेतकऱ्यांपर्यंत हवामान आधारित सल्ला आणि उपाययोजना पोहोचवण्यात येत आहे. पावसाची ओढ कायम राहिल्यास उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून पिकांचे जतन करावे.
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा कृषी अधीक्षक
---
कोट २
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मारलेल्या ओढ्यामुळे भातशेती अडचणीत आली आहे. पावसाने ऐन गरजेवेळी पाठ फिरवल्यामुळे मुख्यत्वे महान (उशिरा येणारी) भातपिके सुकू लागली आहेत. पाणी न मिळाल्याने भाताची शेती पिवळी पडली असून, यावर्षी भात उत्पादनात घट निश्चित आहे. सध्या हळवी भातपिके पसवणीच्या (फळधारणेच्या) टप्प्यात असून त्यांना सध्या तरी फारसा फटका बसलेला नाही.
-सुहास उर्फ बंड्या लिंगायत, शेतकरी, संगमेश्वर
------
कोट ३
भातलावणीवेळी आणि त्यानंतर पावसाचा म्हणावा तितकासा जोर राहिलेला नाही. भातरोपांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी न मिळाल्याने रोपांची अपेक्षित वाढ झालेली नाही. काही ठिकाणी फुटवे कमी आले आहेत. काही भागात भाताच्या रोपांची पाने लालसर अन् पिवळी झाली आहेत. यावर्षी अपेक्षित उत्पादन येण्याची शक्यता कमी आहे. सुमारे ३० टक्के घट होईल, असा अंदाज आहे.
-मनोहर गुरव, राजापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.