

-rat१८p२८.jpg-
26O64862
संगमेश्वर ः कसबा येथील ऐतिहासिक सरदेसाई वाडा.
----
कसब्यातील सरदेसाई वाडा संवर्धित करा
चक्रभेदी फाउंडेशनची मागणी ः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवले पत्र
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. १९ ः इतिहासाचा साक्षीदार असलेला कसबा (ता. संगमेश्वर) येथील ऐतिहासिक सरदेसाई वाडा तातडीने संवर्धित करण्यात यावा, अशी जोरदार मागणी साडवली येथील ‘चक्रभेदी सोशल फाउंडेशन’ने केली आहे. यासंदर्भात फाउंडेशनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना अधिकृत पत्र पाठवून वाड्याचे जतन व स्मृतीस्थळ म्हणून विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संगमेश्वरनजीक असलेला कसबा येथील सरदेसाई वाडा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. याच वाड्यात वास्तव्याला असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मुघल सरदार मुकर्रब खान याने कपटाने आणि दगाफटका करून कैद केले होते. स्वराज्याच्या या महान छत्रपतींचे महाराष्ट्रातील अखेरचे वास्तव्य याच वाड्यात झाले असल्याने, या वाड्याला अत्यंत पवित्र व ऐतिहासिक संदर्भ प्राप्त आहे. एकेकाळी स्वराज्याचे छत्रपती जिथे वास्तव्याला होते, त्या ऐतिहासिक वाड्याची आज मात्र अत्यंत दुरवस्था झाली आहे. देखभालीअभावी वाड्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, अनेक ठिकाणी कौलारू छत कोसळले आहे. वाड्याच्या आतील लाकडी वासे, खांब आणि भिंतींचीही दुरवस्था झाली असून संपूर्ण वास्तू उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. वाड्याचा ऐतिहासिक संदर्भ आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य लक्षात घेता, या वाड्याचा ‘स्मृतीस्थळ’ म्हणून विकास करण्यात यावा, पुरातत्त्व विभागामार्फत वाड्याची तत्काळ प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली आहे.
-----
संयुक्त समिती स्थापन करा
पुरातत्त्व विभाग, इतिहास संशोधक आणि वास्तुविशारदांची (आर्किटेक्ट्स) संयुक्त समिती स्थापन करून वाड्याच्या जतन व संवर्धनाचा वैज्ञानिक आराखडा तयार करावा. तसेच ऐतिहासिक वारसा जपणे हे आपले कर्तव्य असून शासनाने या गंभीर विषयाची तत्काळ दखल घ्यावी, असा आग्रह चक्रभेदी सोशल फाउंडेशनने केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.