कळझोंडीत लोकसहभागातून उभारला साकव

कळझोंडीत लोकसहभागातून उभारला साकव
Published on

‘शिक्षक समन्वय’चे आजपासून
आझाद मैदानावर निर्धार आंदोलन
रत्नागिरी ः वाढीव वेतन अनुदानाचा टप्पा मंजूर करावा तसेच शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघातर्फे सोमवारपासून (ता. २१) मुंबईतील आझाद मैदानावर ‘निर्धार’ आंदोलन करण्यात येणार आहे. वेतन अनुदानासह शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षक समन्वय संघाने पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मागण्यांसंदर्भात संबंधित यंत्रणांना निवेदनेही दिली आहेत. शिक्षकांच्या आर्थिक आणि सेवाविषयक प्रश्नांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी संघाची मागणी आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लागत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, आता मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठविला जाणार आहे. राज्यातील शिक्षकांनी या ‘निर्धार’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक समन्वय संघातर्फे करण्यात आले आहे.

कळझोंडीत लोकसहभागातून उभारला साकव
रत्नागिरी ः रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी गावातील नदीवरील साकव कित्येक वर्षे नादुरुस्त आहे. तो नव्याने बांधून व्हावा, या मागणीसाठी ग्रामस्थ शासन, प्रशासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत होते. मात्र शासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी स्वतः आर्थिक नियोजन करून कळझोंडी कुंभवणे वाडी या ठिकाणी वर्षानुवर्षे प्रलंबित नदीवरील साकवाचे काम लोकसहभागातून पूर्ण केले. परिसरातील सर्वच नागरिकांसाठी ही प्रेरणादायी बाब आहे. आनंदमय वातावरणात साकवाचा उद्‍घाटन समारंभ झाला. याप्रसंगी उद्‌घाटक म्हणून प्रथमेश गावणकर उपस्थित होते. परिसरातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

राजापुरात पुलावरील काही पथदीप बंद
राजापूर ः शहरातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावरील एका बाजूचे पथदीप (स्ट्रीट लाईट) बंद आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. या दरम्यान प्रवास प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाले आहे. महामार्गावर काही भागातील चौपदरी रस्त्याला तडे गेले आहेत, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

चिंचघर-दस्तुरीत २४ ला आरोग्य शिबिर
खेड : तालुक्यातील चिंचघर-दस्तुरी येथील गणेश मित्रमंडळ व डेरवण येथील वालावलकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता. २४) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत श्री भैरवनाथ सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात हार्निया, चरबीच्या गाठी, पोटातील गाठ, पित्ताशयातील खडे, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, मूतखडा, महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया यासह इतर तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेश पवार यांनी केले आहे.

कोरेगावमधील आरोग्य सुविधांचा आढावा
खेड : तालुक्यातील कोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील जनआरोग्य समितीत नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यात आल्या. आरोग्य केंद्रातील औषधसाठा, वैद्यकीय सेवा, साधनसामग्री, मनुष्यबळ व नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सभेत चर्चा झाली. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याबाबत सूचित करत, प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सुविधा प्रभावीपणे पोहोचवण्याचे निर्देश जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांनी दिले. सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, सदस्या शमिका म्हादे, तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल, वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता कोळसुलकर आदी उपस्थित होते.

६५१७०
युवासेनेकडून पोलिसांना उकडीचे मोदक
चिपळूण : गणेशोत्सवाचा आनंद नागरिक कुटुंबीयांसमवेत साजरा करताना कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावतात. सणावेळी घरापासून दूर राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चिपळूण युवासेनेने कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना उकडीच्या मोदकांचे वाटप केले. ‘सण आपला... पण बंदोबस्त त्यांचा!’ या भावनेतून राबविलेल्या उपक्रमात पोलिस कर्मचाऱ्यांना गणपतीच्या प्रसादाचा गोडवा देण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना आदित्य पेडणेकर यांची असून, निहार कोवळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम झाला. अमेय चितळे, शुभम कदम आणि कुलदीप जडेजा उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com