

वैश्य वाणी जात प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा
हिंदू वाणी, हिंदू वैश्य, वैश्य नोंदींनाही लाभ ; दाखला देण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ : वैश्य वाणी समाजाला जातीचा दाखला व जात पडताळणी करून घेताना येणाऱ्या अडचणी आता दूर झाल्या आहेत. हिंदू वाणी, हिंदू वैश्य आणि वैश्य अशा नोंदी असलेल्या समाजबांधवांनाही ‘वैश्य वाणी’ समाजाचा जातीचा दाखला देऊन जात पडताळणी करण्याचे आदेश बहुजन कल्याण विभागाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी केले आहेत.
वैश्य वाणी समाजाचा इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गात समावेश २०१४ मध्ये झाला. त्यानंतर २०१४ ते २०१९ या कालावधीत समाजबांधवांना जातीचा दाखला व जात पडताळणी करून घेणे तुलनेने सुलभ होते. मात्र, १९६७ पूर्वीच्या कागदपत्रांमध्ये वैश्य, हिंदू वाणी, हिंदू वैश्य अशा विविध नोंदी आढळल्याने काही ठिकाणी दाखले व जात पडताळणी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. या प्रश्नाबाबत समाजबांधवांनी जिल्हा संघटनेकडे पाठपुरावा केला.
संगमेश्वर येथील स्वप्नील शेट्ये यांनी पत्रव्यवहार केल्यानंतर तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. त्यानंतर विविध स्तरांवर बैठका घेण्यात आल्या. आमदार प्रमोद जठार यांनी विधिमंडळातही हा प्रश्न उपस्थित केला. २५ ऑगस्ट रोजी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग, महसूल विभाग तसेच मुंबई व रत्नागिरी जिल्ह्यातील वैश्य वाणी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर ९ सप्टेंबरला अधिकृत आदेश जारी करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा वैश्य वाणी समाज संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यामुळे यश आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. विकास शेट्ये यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.