

आठवणीतील गणेशोत्सव------------लोगो
(२० सप्टेंबर पान ३)
तुझा आशीर्वाद दे देवा!
माणूस कितीही श्रीमंत असला, प्रतिष्ठित असला किंवा मोठ्या हुद्द्यावर असला तरीही गणेशोत्सवात ज्या वेळी गणपतीच्या दर्शनाला साध्यातला साधा माणूस येतो तेव्हा त्याला ‘या बसा, प्रसाद घ्या’, असे हात जोडून सर्वत्र सांगितले जाते. कारण, हा सण नुसताच मौजमजेचा नसून नम्रता आणि मांगल्याचे दयोतक आहे.
- राजेंद्र रांगणकर
गणेशगुळे, रत्नागिरी
---
जे सुख नाही जगामध्ये,
ते सुख आहे तुमच्या चरणांमध्ये।
काय सांगू किती झाला आनंद
गणेशा आपल्या आगमनाने।।
प्रथेप्रमाणे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सवाची सुरुवात झाली. बालगोपाळ, आबालवृद्ध अगदी सर्वांच्याच मनाला आनंद झाला. आपल्या लाडक्या गणरायाचे म्हणजेच आपल्या गणरायाचे आगमन झाले. ढोलताशांच्या गजरात पारंपरिकतेने तर काही ठिकाणी लेझिम, भजने अन्य प्रकारे प्रत्येकाने गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. कोकणातील भातशेती पसवायला सुरुवात झाली आहे. या शेतातून, पायवाटेने बिनाचपलाने चालताना माणसाचे पाय धरतीला लागले, ही म्हण सार्थ ठरते. नाहीतर, इतर वेळी आपण चप्पल, बुटाशिवाय न फिरणारी माणसे या निमित्ताने गणरायाच्या चरणी लीन होतो आणि म्हणतो, ‘ हे गणराया, आमची सर्व संकटे दूर कर.’ हिरव्यागार शेतातून जाताना काढलेले फोटो तर इतके आकर्षक दिसतात की, ‘स्वर्ग म्हणजे आपले कोकणच आहे’ यावर शिक्कामोर्तब होते.
या स्वर्गात इतरवेळी कधी फेरफटका मारला तर शुकशुकाट असतो; मात्र आता कसे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. गावाकडे येणाऱ्या चाकरमान्यांची चातकासारखी वाट पाहणारी वृद्ध मंडळी परतलेल्या चाकरमान्यांना पाहून कशी हरखून जातात, त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. गावेच्या गावे एका आगळ्या चैतन्याने भारावून गेलेली दृष्टोत्पत्तीस येतात. सर्वत्र आरती, भजने, गाणी ऐकायला मिळतात. घाईगडबडीत, कामासाठी, नोकरीच्या निमित्ताने धावपळीत असणारा माणूस गणपतीच्या निमित्ताने थोडे दिवस सुटी घेतो आणि स्वतःसाठी, कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी थोडा वेळ देतो, ही किती आनंदाची बाब आहे नाही? गणरायाच्या भेटीसाठी मुंबई, पुणे, बाहेरगावी गेलेला माणूस अगदी परदेशात गेलेला माणूसही आपल्या मूळ गावी येतो आणि गणरायाची मनोभावे पूजा करतो. संध्याकाळी एकमेकांकडे आरतीला, भजनाला जातो. जाकडी, टिपरीनृत्य, फुगड्या, पारंपारिक गाणी, खेळ खेळतो. गणपती दर्शनाच्या निमित्ताने लोकं एकमेकांकडे जातात, आपुलकीचे चार शब्द बोलतात, सामाजिकता जपतात. आपले मन आनंदी करतात. साहजिकच, वर्षभर आलेला ताणतणाव कमी होतो.
मला आलेला अनुभव असा की, माणूस कितीही श्रीमंत असला, प्रतिष्ठित असला किंवा मोठ्या हुद्द्यावर जरी असला तरी ज्या वेळी गणपतीच्या दर्शनाला साध्यातला साधा माणूस, गरीब माणूस जेव्हा दर्शनाला येतो तेव्हा त्याला ‘या बसा, प्रसाद घ्या’, असे हात जोडून सांगतो म्हणजेच हा सण नम्रता आणि मांगल्याचे दयोतक आहे, असेच मला वाटते. या सणाच्यानिमित्ताने बाजारपेठेत विविध छोटे व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी, फळविक्रेते, वाहतूक व्यवस्था या सर्व व्यवहारांना तेजी येते. गणपतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर खरेदी होते म्हणजे आपणच एकमेकांना जगण्यासाठी, जगण्याचा हात देत असतो. याचवेळी मखर सजावटीच्या निमित्ताने वेगवेगळे देखावे पाहण्यास मिळतात. त्यातून समाजजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. हरितालिका पूजन, गणेशचतुर्थी, ऋषीपंचमी, गौरी आगमन, गौरीपूजन, गौरी विसर्जन, वामन द्वादशी, अनंत चतुर्दशी हे दिवस या सणातील महत्त्वाचे दिवस; पण यात मनाला हुरहूर लावणारी गोष्ट असते ती म्हणजे दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, वामन द्वादशी, अनंत चतुर्दशी या दिवशी होणारे गणपतींचे विसर्जन. या दिवसांच्या भावना शब्दात सांगू शकणाऱ्या नसतात. कितीही मनात नसले, पावले जड झाली असली, अंत:करण भरून आले असले तरीही ओसंडू पाहणारे अश्रू गिळत आपण उसने अवसान आणत उत्साहाने म्हणतो,
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’
शेवटी विसर्जनानंतर प्रत्येकजण वर्षभराची ऊर्जा घेऊन आपापल्या कामाला निघून जातो. गणेशोत्सवाच्या आठवणी मनात ठेवून त्या विघ्नहर्त्याच्या भरोशावर सर्व सोडून पुन्हा समाजातील गर्दीत गुडूप होतो. मनात मात्र पुढच्या वर्षीची गणरायाच्या आगमनाची तारीख असते. जास्त उत्साहाने, आनंदाने गणपतीचे स्वागत करण्याची उर्मी असते तरीही एक मात्र खरे......
मोठी स्वप्न बघणारे आम्ही जरी असलो तरी स्वप्नांना मूर्तरूपात आणणारा
तू आहेस गणराया, आम्हास बळ दे
हा संसाररूपी व्याप सांभाळण्यास तुझा आशीर्वाद दे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.