‘न. ए.’ उपाध्यक्षपदी विजय चितळेंची निवड

‘न. ए.’ उपाध्यक्षपदी विजय चितळेंची निवड
Published on

rat21p8.jpg -
65365
विजय चितळे

‘न. ए.’च्या उपाध्यक्षपदी
विजय चितळेंची निवड
चिपळूण : न. ए. सोसायटीच्या उपाध्यक्षपदी विजय चितळे यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. संस्थेच्या कार्यात सातत्याने योगदान देणारे तसेच सभासदांच्या हिताच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून चितळे यांची ओळख आहे. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सभासदांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभासदांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, संस्थेचा कारभार अधिक प्रभावी करणे आणि बदलत्या काळानुसार आवश्यक सुधारणा करण्यावर भर देणार असल्याचे चितळे यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
------------
काडवलीतील गणेशोत्सव
स्पर्धेचा निकाल जाहीर
चिपळूण : काडवली-चौरसवाडी येथील श्री रामवरदायिनी फाउंडेशनतर्फे आयोजित ‘घरगुती गणेशोत्सव २०२६’ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत पर्यावरण संवर्धन, महाराष्ट्राची परंपरा तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक वारशावर आधारित देखाव्यांनी लक्ष वेधून घेतले. किरण धाडवे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांनी ‘पर्यावरणाचा ऱ्हास’ हा विषय घेऊन देखावा साकारला होता. ऋतुजा नाकते यांनी ‘महाराष्ट्राची परंपरा’ या देखाव्यासाठी द्वितीय, तर राकेश मांजरेकर यांनी ‘मार्लेश्वर’ देखाव्यासाठी तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक श्रेयश महाडिक यांना मिळाला. त्यांनी ‘महादेवाचे कैलास पर्वत’ देखावा साकारला, तर गणेश कांगणे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. त्यांनी ‘जेजुरी नगरी’ हा देखावा साकारला. सत्कार समारंभात सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
------------------
अलोरे-शिरगाव पोलिसांसाठी
आरोग्य तपासणी शिबिर
चिपळूण ः पोलिसांचे कामकाज व्यस्त आणि तणावपूर्ण असते. दिवस-रात्र कर्तव्य बजावताना त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी अलोरे-शिरगाव पोलिस ठाणे आणि लाइफकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. पोलिस ठाण्यात आयोजित या शिबिराला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात सहभागी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच ग्रामस्थांनाही विविध आरोग्यविषयक तपासण्यांचा लाभ घेता आला.
---------
वैदेही सावंत यांना
‘स्नेहबंध’ पुरस्कार
साखरपा : चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत यांना स्नेहबंध बहुद्देशीय फाउंडेशनने पुरस्कार देऊन सन्मानित केले. एकल, विधवा महिला तसेच विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाची दाखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. स्नेहबंध संस्थेचा एक विशेष कार्यक्रम फेपडेवाडी-मानसकोंड (ता. संगमेश्वर) येथे झाला. यावेळी संस्थेचा लोगो अनावरण, वस्त्रदान समर्पण सोहळा झाला. सावंत यांच्या कार्याची दखल या कार्यक्रमात घेण्यात आली.
----------
पाले येथे मोफत
श्रवणयंत्रांचे वाटप
मंडणगड : भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा अनुसूचित जाती मोर्चातर्फे पाले येथे गरजू कर्णबधिर नागरिकांना मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष मंगेश मोहिते आणि जिल्हा सरचिटणीस अभिजित देवळेकर यांच्या पुढाकारातून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत आंबवणे खुर्द येथील शेवंती फोपले यांना देवळेकर यांच्या हस्ते श्रवणयंत्र प्रदान करण्यात आले. श्रवणयंत्रामुळे कुटुंबीयांशी संवाद साधणे, दैनंदिन व्यवहार करणे तसेच सामाजिक जीवनात अधिक आत्मविश्वासाने सहभागी होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com