

rat२१p१०.jpg-
६५३६६
राजापूर ः कशेळी येथील कनकादित्य मंदिर.
-rat२१p११.jpg-
६५३६७
समुद्रकिनाऱ्यावरील देवघळी परिसर.
-----------
कशेळीच्या ‘सौरगाव’ योजनेला प्रतिसादाचा अभाव
सहाशेहून अधिक कुटुंबांशी संवाद; वर्षभरात केवळ आठ सोलर जोडण्या कार्यान्वित
राजापूर, ता. २१ ः भारतातील तीन प्रमुख सूर्यमंदिरांपैकी एक असलेल्या कनकादित्य मंदिरामुळे धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध झालेल्या कशेळी गावाला ‘सौरगाव’ (सोलर व्हिलेज) करण्याच्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ब्रेक लागला आहे. वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत सहाशेहून अधिक कुटुंबांशी संवाद साधून सर्वेक्षण करण्यात आले होते; मात्र, आतापर्यंत केवळ आठ सोलर जोडण्या कार्यान्वित झाले आहेत.
कशेळीला सौरगाव करण्यासाठी गतवर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला होता. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला अनुदान देण्याचेही नियोजन केले होते. त्यासाठी गावात बैठका घेऊन नागरिकांना योजनेची माहिती देण्यात आली तसेच वाडीवस्तीवर भेटी देऊन सर्वेक्षण करण्यात आले; मात्र, वर्षभराचा कालावधी उलटूनही योजनेच्या अंमलबजावणीला अपेक्षित गती मिळालेली नाही. गावपरिसरात मोठ्या प्रमाणात झाडी असल्याने सौरपॅनेल बसवण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे कशेळी सौरगाव करण्याच्या उपक्रमाला सध्या मर्यादा आल्या आहेत.
चौकट
वैशिष्ट्यपूर्ण कशेळी
महाराष्ट्रातील कशेळी येथील एकमेव कनकादित्य सूर्यमंदिर हजारो वर्षापूर्वीचे आहे. कनकादित्यची विलोभनीय मूर्ती, मंदिराचे लाकडाच्या सहाय्याने तयार केलेले सभामंडप आणि त्यावरील आकर्षक कोरीवकाम असून, कोकणी कौलारू स्थापत्य शैली येथे पाहायला मिळते. मंदिरापासून काही कि.मी. अंतरावर शांत आणि विलोभनीय सुमद्रकिनारा आहे. या किनार्यावरील देवघळी बीचला पर्यटकांची पसंती असून, समुद्राचा गाज आणि बीचचे मनमोहक सौंदर्य अनुभवण्यासाठी शेकडो पर्यटक या ठिकाणी दरदिवशी येतात.
------------
चौकट
दृष्टिक्षेपात कशेळी
एकूण घरे ः ६१६
एकूण कुटुंबे ः ९६५
एकूण अंगणवाडी ः ६
एकूण शाळा ः ५
एकूण मंदिरे ः ७
एकूण शासकीय इमारती ः ३
एकूण वीजवितरण ग्राहक ः ८७७
एकूण सोलर कनेक्शन ः ८
----------
कोट
रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे कशेळी येथे सौरगाव ही संकल्पना राबवण्याचा निर्धार केला होता. त्याबाबत गतवर्षी कशेळी गावामध्ये बैठकांद्वारे लोकांशी संवाद साधण्यासोबत प्रशासनाकडून पाहाणीही झाले होते. महावितरण विभागानेही लोकांशी संवाद साधत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीजयोजना पोहचवली होती; मात्र, प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी करण्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. गावामध्ये झाडीचे प्रमाण जास्त असल्याने योजनेची अंमलबजावणी करण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत.
- जमीर तांबोळी, उपअभियंता, महावितरण विभाग, राजापूर