

रत्नागिरी जिल्ह्यात १५० नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार
रत्नागिरी, ता. २१ : रत्नागिरी एसटी विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. जुन्या व भंगारात गेलेल्या एसटी बसेसच्या जागी आता अत्याधुनिक जिजाऊ आणि स्मार्ट बसेस रस्त्यावर धावणार आहेत. यामुळे कोकणातील प्रवाशांचा प्रवास अत्यंत आरामदायी आणि सुरक्षित होणार आहे. १५० नव्या स्मार्ट एसटी बसेस रत्नागिरी विभागाला मिळणार असून, त्यासोबतच आणखी १०० राजमाता जिजाऊ बसेस मिळण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
रत्नागिरी विभागात पूर्वी तब्बल ६५० एसटी बसेस कार्यरत होत्या; मात्र, गेल्या काही महिन्यांत २००हून अधिक बसेस भंगारात गेल्याने वाहतुकीवर ताण आला होता. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने नवीन ५ हजार स्मार्ट बसेस खरेदी करण्यात येत आहेत. यातील १५० नव्या स्मार्ट एसटी बसेस रत्नागिरीला मिळतील. तसेच आणखी १०० राजमाता जिजाऊ बसेस मिळण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली.
नव्या बसेसच्या आगमनामुळे रत्नागिरी-कोल्हापूर, मुंबई आणि पुणे या मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, जुन्या व खिळखिळ्या झालेल्या बसेसच्या त्रासापासून सुटका होणार आहे. पर्यावरणपूरक प्रवासासाठी ''ई-शिवाई'' बसेसला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी शहरात ई-बसेस चालवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चार्जिंग स्टेशनचे काम सध्या प्रगतीपथावर असून, त्याचे टेंडरही काढण्यात आले आहे. वीजजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर दिवाळीपर्यंत ई-बसेस प्रत्यक्ष रस्त्यावर धावतील, अशी माहिती विभाग नियंत्रक अश्वजित जानराव यांनी दिली आहे.
चौकट १
उपलब्ध गाड्यांची संख्या
एकूण साध्या बसेस: ५५३
शहरी बसेस: १८
जिजाऊ बसेस: ६०
स्लिपर बसेस: २४
ई-शिवाई बसेस: २१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.