

rat22p5.jpg
65534
रत्नागिरी - येथे विमानतळाची अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करताना पालकमंत्री उदय सामंत.
rat22p6.jpg-
65535
रत्नागिरी विमानतळ टर्मिनल बिल्डिंग.
रत्नागिरी विमानतळावर उभारणार आयएलएस यंत्रणा
पालकमंत्री उदय सामंत; विस्तारात घरे, मंदिरे सुरक्षित ठेवण्याची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : येथील विमानतळाच्या विकासाला आणि रात्री तसेच प्रतिकूल हवामानात विमान उतरण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘आयएलएस’ (इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम) उभारणीला गती मिळाली आहे. विमानतळाच्या विस्तारासाठी स्थानिकांची घरे किंवा मंदिरे बाधित होणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल. विकासासोबत स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
आयएलएस उभारणीसाठी सुमारे सात एकर जागेची आवश्यकता असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये चिंता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सामंत यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विमानतळ परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. बाधित होऊ शकणारी घरे व जागांची पाहणी करून त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आयएलएससाठी कमीत कमी जागा लागावी आणि स्थानिकांची घरे व मंदिरे सुरक्षित राहावीत यासाठी दमण विमानतळावर वापरण्यात येणाऱ्या विशेष ‘एअरपोर्ट सिस्टिम’चा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आहे.
दमण प्रशासनाशी चर्चा करून ही यंत्रणा रत्नागिरीत राबवता येईल का, याची शक्यता तपासण्याचे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले. स्थानिकांचे कोणतेही नुकसान न करता तांत्रिक काम पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. विमानतळाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्याच्या आर्थिक व पर्यटन विकासासाठी विमानतळ महत्त्वाचा असला तरी विकासाच्या नावाखाली स्थानिकांना बेघर केले जाणार नाही किंवा त्यांची श्रद्धास्थाने बाधित केली जाणार नाहीत. स्थानिकांचे हक्क जपूनच विमानतळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
चौकट
आयएलएस यंत्रणेचे हे आहेत फायदे
* धुके, ढग, पाऊस या वेळी धावपट्टी स्पष्ट दिसत नसली तरी आयएलएस पायलटला मार्गदर्शक ठरते.
* अंधारातही विमानाला धावपट्टीच्या दिशेने अचूक मार्गदर्शन मिळते
* विमान धावपट्टीच्या मध्यरेषेशी आणि योग्य उतरण्याच्या कोनाशी संरेखित ठेवण्यास आयएलएस उपयुक्त
* प्रतिकूल हवामानात विमानाला धावपट्टीपासून भरकटण्याचा धोका कमी होतो.
* हवामानामुळे लँडिंगमध्ये होणारे व्यत्यय कमी होण्यास मदत होते.
* विशेषतः नियमित प्रवासी विमानसेवा असलेल्या विमानतळांसाठी ही सुविधा महत्त्वाची
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.