

चिपळुणात नदी दिन,
पर्यटनदिनाचा जागर
चला जाणूया नदीला कार्यक्रम २७ रोजी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २२ : राज्यशासनाच्या जलसंपदा उपविभाग चिपळूण आणि अर्थ फाउंडेशन, ग्लोबल चिपळूण टुरिझम, सह्याद्री निसर्गमित्र, सेवासाधना प्रतिष्ठान यांच्यावतीने ‘जल साक्षरता’ व ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जागतिक नदी दिन व जागतिक पर्यटनदिन रविवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात साजरा करण्यात येणार आहे.
नद्यांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्याबरोबरच नदी प्रदूषण, कचरा, अतिक्रमण रोखणे आणि नदी पुनरूज्जीवनाबाबत जनजागृती करण्याचा कार्यक्रमाचा उद्देश आहे. नद्या, जंगल, जैवविविधता आणि मानवी जीवन यांचा परस्परसंबंध युवापिढीसमोर मांडला जाणार आहे. यंदाचा जागतिक नदी दिन ‘जंगल नाही, नद्या नाहीत, पाणी नाही, जीवन नाही’ या संकल्पनेवर आधारित आहे. त्याचबरोबर जागतिक पर्यटनदिनानिमित्त पर्यटन क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका यावरही चर्चा होणार आहे.
चिपळूण शहर व परिसरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमात मोठा सहभाग राहणार आहे. सती महाविद्यालय, डीबीजे महाविद्यालय, गुरूकुल, आनंदराव पवार महाविद्यालय, ए. ई. काळसेकर महाविद्यालय, नॅशनल कॉलेज मिरजोळी, रिगल कॉलेज कोंढे, आरसी कॉलेज पेढे-परशुराम, सुरेश दामोदर गद्रे कनिष्ठ महाविद्यालय आणि एसपीएम कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. नदी, जंगल, कृषी, पक्षी निरीक्षण आणि पर्यटन या विषयांवर पथनाट्य, नाटिका, प्रहसन, समूहगीत, वक्तृत्व आणि भारूड सादर केले जाणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनक्षेत्रातील स्थानिक यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा व मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शाश्वत विकासाचा विचार युवापिढीपर्यंत पोहोचवून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी, सामाजिक व शैक्षणिक संस्था, युवा मंडळे आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.