

‘पोटखराबा’ नोंद बदलून ‘वरकस’ करा
राजापूर पंचायत समितीचा ठराव; शेतकऱ्यांना पीककर्ज, भरपाई मिळण्यात अडचण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ ः रत्नागिरी जिल्ह्याला शासनाने ‘फलोत्पादन जिल्हा’ घोषित केल्याने राजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पडीक जमिनींवर फळबाग आणि भातशेती फुलवली आहे; मात्र, प्रत्यक्ष लागवड होऊनही सातबारा उताऱ्यावर अद्याप ‘पडीक’ किंवा ‘पोटखराबा’ अशीच नोंद राहिल्याने शेतकऱ्यांना शासकीय योजना, पीककर्ज आणि नुकसानभरपाई मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. यावर तोडगा म्हणून सातबारा उताऱ्यावरील ‘पोटखराबा’ नोंदी बदलून तेथे ‘वरकस’ अशी नोंद करण्यात यावी, असा ठराव पंचायत समितीच्या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. तसेच महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.
शासनाच्या फळबाग लागवड योजनेसह विविध उपक्रमांचा लाभ घेत शेतकऱ्यांनी स्वतःच्या कष्टातून पडीक जमिनी ओलिताखाली आणल्या आहेत; परंतु, सातबारा उताऱ्यावर वेळेत सुधारित नोंद न झाल्यामुळे कागदोपत्री हे क्षेत्र अद्यापही पडीक किंवा पोटखराबा म्हणूनच दिसत आहे. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या विविध सवलती व भरपाईपासून शेतकरी वंचित राहत असल्याचे राजेश गुरव यांनी पंचायत समितीच्या सभेत सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. लागवड झालेली असूनही कागदोपत्री ‘पोटखराबा’ नोंद असल्याने पीकविम्याचा अपेक्षित लाभ मिळत नाही. तसेच बँकेकडून शेतीकर्ज मिळताना अडचणी येतात; कर्ज मंजूर झाले तरी ते ‘वरकस’ जमिनीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात मिळते.
नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास मिळणारी शासकीय भरपाई ही कागदोपत्री नोंदींमुळे अत्यंत कमी प्रमाणात मिळते. उताऱ्यावरील वरकस क्षेत्राची नोंद अपडेट न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे ही तांत्रिक अडचण दूर करून ‘पोटखराबा’ ऐवजी ‘वरकस’ नोंद करण्यासाठी राजापूर पंचायत समिती महसूल विभागाकडे आक्रमक पाठपुरावा करणार आहे.
---
नुकसान भरपाई कमी मिळते
लागवड होऊनही सातबारा उताऱ्यावर वरकसऐवजी पोटखराब क्षेत्र म्हणून नोंद असल्याने शेतकऱ्यांना शासनाच्या पीकविमा योजनेचा अपेक्षित लाभ मिळत नाही. त्याचवेळी शेतीकर्ज मिळण्यामध्ये अडचणी येतात. त्यातूनही शेतीकर्ज मिळाल्यास वरकस क्षेत्राच्या तुलनेत मिळत असल्याने अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात कर्जाची रक्कम मिळते. शासनाकडून मिळणारी शेती नुकसान भरपाईही कमी प्रमाणात मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.