

गोडबोले विद्यामंदिरात पालक मेळावा
रत्नागिरी ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात पालक मेळावा आयोजित करण्यात आला. या निमित्ताने महिला पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेचे उद्घाटन केळ्ये गावच्या सरपंच सौरभी पाचकुडवे यांनी केले. पालक संघाचे मार्गदर्शक सुहास सहस्त्रबुद्धे, ग्रामपंचायत सदस्य गजानन नाखरेकर, पालक संघाचे सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापिका स्नेहा पाटील यांनी शालेय कामकाज नियोजन, शालेय परीक्षा, सहशालेय उपक्रम, विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना, शाळेसाठी लागणारी विद्यार्थ्यांसंदर्भात महत्त्वाची कागदपत्रे, आधार अपडेट करून घेणे आदीची याची माहिती दिली.
जांभेकर विद्यालयात ‘माहितीचा अधिकार’ दिन
रत्नागिरी ः सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात जागतिक माहितीचा अधिकार दिनानिमित्त शिक्षक राजेश कांबळे यांनी माहितीच्या अधिकाराचे महत्त्व व उद्देश समजावून सांगितला. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ मध्ये लागू करण्यात आला. शासनाच्या कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी या कायद्याचे महत्त्व आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामांची माहिती जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना आहे. नागरिकांनी आपल्या अधिकारांची जाणीव ठेवून त्यांचा योग्य पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत मागितलेली माहिती संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याने साधारणपणे ३० दिवसांच्या आत देणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
तोरगलकर महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांची कातळशिल्पाला भेट
रत्नागिरी ः श्रीमान मंगेश बापुजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारसू येथील प्राचीन आणि रहस्यमय कातळ शिल्पाला भेट दिली. आडिवरेमार्गे प्रवास करत विद्यार्थ्यांनी बारसू गाठले आणि या ऐतिहासिक वारशाची कुतूहलाने पाहणी केली. तेथे कातळखोद शिल्पाचे शोधकर्ते धनंजय मराठे यांनी कातळशिल्पांचा हजारो वर्षांचा इतिहास, अश्मयुगीन मानवाची जीवनशैली, कोरीव कामामागील अर्थ आणि या वारशाचे महत्त्व सांगितले. नंतर श्री क्षेत्र धूतपापेश्वर मंदिर, उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे आणि राजापूरची गंगा या नैसर्गिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेट दिली. दुपारी गगनबावडा मठाला भेट दिली. उपक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या समन्वयक दीप्ती पंडित आणि श्रीनिवास जोशी यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.