

बाल जलतरणपटू रेयांश खामकरला
ठाणे महापालिकेतर्फे क्रीडा पुरस्कार
लांजा, ता. ४ ः अगदी लहान वयातच आपल्या जलतरणाचा करिश्मा दाखवत देश-विदेशात यश संपादन करणारा लांजा तालुक्यातील आरगावचा सुपुत्र, बाल जलतरणपटू रेयांश खामकर याला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ''विशेष क्रीडा पुरस्कारा''ने सन्मानित करण्यात आले. ठाणे पालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून गुरुवारी आयोजित शानदार सोहळ्यात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रेयांश खामकर याने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून जलतरण स्पर्धा गाजवण्यास सुरुवात केली आहे. थायलंड (बँकॉक) येथे पार पडलेल्या ''एशियन ओपन स्कूल स्विमिंग चॅम्पियनशिप'' या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने ४ रौप्य आणि १ कांस्य अशा एकूण ५ पदकांची लखलखती कमाई केली होती. या यशाद्वारे त्याने लांजा तालुक्यासह संपूर्ण देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले. जलतर क्षेत्रातील त्याच्या या अफाट कामगिरीची नोंद ''इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स''ने देखील घेतली आहे.
यापूर्वी त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेही त्याचा विशेष सत्कार करण्यात आला होता. ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना ''ठाणे गुणीजन'', ''ठाणे गौरव'', ''ठाणे भूषण'' व ''विशेष क्रीडा-कला पुरस्कारा''ने सन्मानित केले जाते. यावर्षीचा ''विशेष क्रीडा पुरस्कार'' रेयांशला जाहीर झाला होता. पुरस्कार वितरणावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह ठाणे पालिकेतील विविध अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.