चिपळूणात भातशेती करपली

चिपळूणात भातशेती करपली
Published on: 

rat४p१.jpg-
६७७००
चिपळूण : तालुक्यात भात शेती पाण्याअभावी करपू लागली आहे.
----------

चिपळुणात भातशेती करपली
उत्पादनात मोठी घट ; पावसाची ओढ
चिपळूण, ता. ४ : सप्टेंबरमध्ये पावसाने दिलेली मोठी ओढ आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पाण्याच्या ताणाचा फटका आता चिपळूण व गुहागर तालुक्यांतील भातशेतीला बसू लागला आहे. भात आणि नाचणी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ऐन दाणे भरण्याच्या काळात पिकाला आवश्यक ओलावा न मिळाल्याने अनेक ठिकाणी भाताची रोपे पिवळी पडली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ४८ हजार हेक्टर भात लागवडीपैकी सुमारे २१.१ टक्के क्षेत्र चिपळूण आणि गुहागर या दोन तालुक्यांत आहे. चिपळूण आणि गुहागर तालुक्यांत जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत सुमारे ८० टक्के पाऊस झाला असला तरी त्याचे वितरण अत्यंत असमान राहिले. विशेषतः सप्टेंबरमध्ये गुहागर तालुक्यात केवळ ४८ टक्के, तर चिपळूण तालुक्यात ५४ टक्के पाऊस नोंदला गेला. मार्गताम्हाणे, रामपूर, कळकवणे यांसह विविध भागांत पावसाच्या खंडाचा परिणाम भातशेतीवर जाणवत आहे.
भातपीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते. मात्र, पाऊस लांबल्याने काही शेतांमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. रोपे पिवळी पडू लागल्याने लोंब्यांमध्ये अपेक्षित दाणे भरण्याची प्रक्रिया प्रभावित झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पादनाऐवजी पेंढा राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरम्यान, चिपळूण तालुक्यात भातपिकावरील ‘हळद्या’ म्हणून स्थानिक पातळीवर उल्लेख होत असलेल्या प्रादुर्भावाची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी, नमुने घेऊन तज्ज्ञांकडून रोगाचे निदान आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी कृषी विभागाकडे करण्यात आली आहे.
पावसातील मोठ्या तुटीमुळे भात व नाचणी उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने चिपळूण आणि गुहागर तालुक्यांच्या पीकस्थितीचा फेरआढावा घेण्याची मागणी जोर धरत आहे. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन संयुक्त पाहणी करून पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

चौकट

आकडेवारी बोलते
४८ टक्के - सप्टेंबरमधील गुहागरचा पाऊस
५४ टक्के - सप्टेंबरमधील चिपळूणचा पाऊस
८० टक्के - जून ते सप्टेंबरदरम्यान दोन्ही तालुक्यांत झालेला सुमारे पाऊस
५० टक्क्यांपर्यंत - काही भागांत पीक उत्पादन घटण्याची भीती
भात, नाचणी - करपा व पावसाच्या खंडाचा फटका
----------
चौकट
चिपळूण तालुका : ७,४३७ हेक्टर भात लागवड
गुहागर तालुका : २,६९९ हेक्टर भात लागवड
दोन्ही तालुक्यांची एकत्रित भात लागवड : १०,१३६ हेक्टर
-------
कोट
काही ठिकाणी भाताशेतीला करपा गेला आहे त्यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना आम्ही सूचना केल्या आहेत. औषध फवारणीसाठी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.
- शत्रुघन म्हेत्रे, तालुका कृषी अधिकारी, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com