

- rat८p३.jpg-
26O68539
देवरूख ः लोकसहभागातून दत्तनगर येथे उभारलेला मातीचा बंधारा.
----
लोकसहभागातून दत्तनगरमध्ये उभारला बंधारा
विहिरी-बोरवेलना मिळणार आधार ; नागरिकांचा पुढाकार
सकाळ वृत्तेसवा
देवरूख, ता. ८ : यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असताना देवरूख शहरातील दत्तनगरवासियांनी आतापासूनच पाणीसाठवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे. दत्तनगर येथील ‘श्री बाल मित्रमंडळ’ आणि स्थानिक नागरिकांनी लोकसहभागातून चोरपऱ्या येथे मातीचा मजबूत बंधारा उभारण्यात आला आहे. या उपक्रमातून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश देत इतर प्रभागांसमोरही आदर्श निर्माण केला आहे.
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जलसाठे पूर्णक्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत जिरवणे गरजेचे आहे. शासनाच्या मदतीची वाट न पाहता नागरिकांनीच पुढाकार घेण्याची गरज ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बोथले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. चोरपऱ्या येथे उभारलेल्या बंधाऱ्यात पाणी साचल्याने परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. त्याचा फायदा विहिरी तसेच बोरवेलच्या पाणीपातळीला होऊन उन्हाळ्यात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. या उपक्रमासाठी नगरसेवक सिद्धेश वेल्हाळ यांच्यासह सागर पोवार, संजय वेल्हाळ, प्रवीण सावंत, संदीप वेल्हाळ, नंदू बोथले, अमेय मांडवकर, राज शिंदे, संजय आंबेकर आणि बाळू नाखरेकर यांनी श्रमदान व सहकार्य केले. दत्तनगरवासियांनी दाखवलेली एकजूट आणि तत्परता कौतुकास्पद असून, इतर प्रभागांतील नागरिक व लोकप्रतिनिधींनीही यापासून प्रेरणा घेऊन मातीचे तसेच वनराई बंधारे उभारल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
हे आहेत प्रमुख फायदे
* पाणी अडवल्याने ते जमिनीत मुरेल अन् भूजलपातळी वाढेल.
* विहिरी आणि बोअरवेलमधील पाण्याचा साठा वाढेल.
* उन्हाळ्यातील पाणीटंचाईत नागरिकांना दिलासा मिळेल.
* बंधाऱ्यामुळे पाण्यासोबत वाहून जाणारी सुपीक माती अडवली जाईल.
* लोकसहभागामुळे स्थानिक पातळीवरच समस्येचे निवारण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.