

स्मार्टमीटरवरून ‘आरपीआय’ आक्रमक
सात दिवसांत तक्रारींचे निरसन करा ; अन्यथा महावितरण कार्यालयावर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ८ : तालुक्यात महावितरणकडून स्मार्टमीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे; मात्र, या प्रक्रियेदरम्यान वीजग्राहकांकडून अनेक तक्रारी, शंका आणि बिलांमधील तफावतीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्राहकांच्या या असंतोषाची दखल घेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष आक्रमक झाला आहे. महावितरणने ग्राहकांना पारदर्शक माहिती देऊन तक्रारींचे निरसन करावे अन्यथा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा थेट इशारा पक्षाच्यावतीने देण्यात आला आहे.
या संदर्भात महावितरण प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. आरपीआयचे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ते म्हणाले, ‘‘स्मार्टमीटरच्या नावाखाली सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार टाकला जात असल्यास तो अजिबात सहन केला जाणार नाही. महावितरण प्रशासनाने ग्राहकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहायला हवे. आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी असलो तरी जनतेच्या हिताशी तडजोड करणार नाही. जनतेवर अन्याय होत असल्यास गप्प बसणार नाही.’’
महावितरण प्रशासनाने या सर्व मागण्यांवर येत्या सात दिवसांत ठोस आणि सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मुदत निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. या कालावधीत समाधानकारक तोडगा न निघाल्यास खेड येथील महावितरण विभागीय कार्यालयावर भव्य धडक मोर्चा, निदर्शने आणि तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा निर्धार सुशांत सकपाळ यांनी व्यक्त केला आहे.
---
या आहेत प्रमुख मागण्या
* नवीन स्मार्टमीटर बसवण्यापूर्वी जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग आणि त्याची खरी स्थिती ग्राहकांना अधिकृतपणे कळवावी.
* नवीन मीटरची कार्यपद्धती व बिलिंग प्रक्रिया स्पष्ट करावी.
* मीटर वेगाने धावणे किंवा अतिरिक्त बिल येणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास मीटरची तांत्रिक तपासणी करावी.
* नवीन मीटर बसवल्यानंतर बिलांमध्ये येणारा फरक व त्रुटी तातडीने दूर करण्यात याव्यात.
* स्मार्टमीटरबाबत पसरणाऱ्या अफवा दूर करण्यासाठी ग्राहकांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.