ठाकरे गटाकडून सिव्हिल प्रशासनाला विचारला जाब

ठाकरे गटाकडून  सिव्हिल प्रशासनाला विचारला जाब
Published on: 

-rat८p१.jpg-
P26O68537
रत्नागिरी ः जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ठाकरे शिवसेनेने सिव्हिल प्रशासनाला जाब विचारला.
---
‘सिव्हिल’मधील समस्या तातडीने दूर करा
ठाकरे शिवसेना; सीटी स्कॅन मशिनसह पार्किंगचे प्रश्न सोडवा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्वसामान्य रुग्णांना भेडसावणाऱ्या गैरसोयी तातडीने दूर करण्याच्या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली आहे. बंद असलेले सीटी स्कॅन मशिन, अपघात विभागातील गैरसोयी, सुरक्षारक्षकांची कमतरता आणि विस्कळीत पार्किंगसह विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता डॉ. रामानंद यांची भेट घेऊन प्रशासनाला जाब विचारला. समस्या तातडीने मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
शिवसेनेचे तालुका समन्वयक शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख मयूर पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख रशिदा गोडिल, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, महिला शहरप्रमुख सेजल बोराटे, उपशहरप्रमुख नितीन तळेकर व सलील डाफळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने अधिष्ठातांची भेट घेतली. या वेळी रुग्णालयातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेले सीटी स्कॅन मशिन तातडीने सुरू करावे, अपघात विभागातील रुग्णांशी उर्मटपणे बोलणाऱ्या नवख्या डॉक्टरांवर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षारक्षकांची कमतरता दूर करावी, अशी मागणी करण्यात आली. औषध वितरण केंद्रावर स्पष्ट फलक, नवीन ठिकाणी हलविण्यात आलेल्या अपघात विभागासाठी दिशादर्शक फलक आणि पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्याची मागणीही करण्यात आली.
सर्वसामान्य रुग्णांना उपचारासाठी ताटकळत ठेवणे किंवा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागणे हे सहन केले जाणार नाही. सर्व समस्या लवकर सोडवल्या नाहीत तर ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिष्टमंडळाने दिला. या वेळी उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण, सुभाष रहाटे, विभागप्रमुख किरण तोडणकर, प्रसन्न उर्फ बंड्या सुर्वे, नगरसेवक अमित विलणकर, केतन शेटे, दिलावर गोदड, बाबू चव्हाण आदी उपस्थित होते.
---
गैरसोयी दूर करण्याचे आश्वासन
जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. सीटी स्कॅन मशिन, सुरक्षाव्यवस्था, दिशादर्शक फलक, औषध वितरण केंद्र आणि पार्किंग व्यवस्थेबाबत आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने करण्यात येतील. रुग्णांना उपचार घेताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com