चहाला पर्याय तर अनेक

चहाला पर्याय तर अनेक
Published on: 

rat9p2.jpg-
68737
संगीता खरात

पाक-पोषण.........लोगो

इंट्रो

संपूर्ण जगभरात चहापान हा कौटुंबिक आणि व्यावसायिक नातेसंबंधाचा पाया झाला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला चहाची सवय लागली आहे. चहाची वेळ झाली आणि तो मिळाला नाही की, आपण अस्वस्थ होतो. अशावेळी काय करता येईल? चहाला काही पर्याय आहेत का? तर होय. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चहाची तलफ आपल्यावर त्याचवेळी काहीतरी पिणे हे आपल्या मेंदूसाठी आवश्यक असते. अगदी नुसते गरम पाणी प्याले तरी थोडे शांत वाटू शकते. त्यामुळे आधी गरम पाणी प्या आणि शांतपणे विचार करा की, मी आता अजून काय पिऊ? याचा खूप फायदा होतो. हे मी स्वानुभवाने सांगू शकते, असा लेखिकेचा दावा आहे.

- संगीता खरात,
सहसंचालिका, सृष्टीज्ञान संस्था
-----
चहाला पर्याय तर अनेक

चहा हा भारतात प्यायला केवळ १०० वर्षांपूर्वी सुरवात झाली आहे. त्या आधी आपण काय पित होतो याचा विचार करता त्यात ऋतुमानानुसार विविध पेयांचा वापर केला जात होता, असे लक्षात येते. उन्हाळ्यात शरीराला थंड करणारे मुख्यत: दूध, लस्सी, ताक, विविध फळांचे रस, सरबते, अंबिलसारखी आंबवलेली पेये यांचा वापर केला जात होता तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये होणारे सर्दी-खोकला-पोटाचे विकार पाहता हळद-सुंठ घातलेले दूध, कडधान्ये आणि भाज्यांची कढणे, विविध धान्यांच्या पेज, औषधी वनस्पतींचे विविध काढे, मसाल्यांचे कशाय यांचा समावेश होता. यातील औषधी काढे आणि कशाय यांनाच आता हर्बल टी म्हटले जाते. त्यानुसार ऋतुमान आणि आपली जीवनशैली यांची सांगड घालून आपण विविध प्रकारची पेये सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र अशा वेगवेगळ्या वेळेनुसार निवडली आणि त्यात प्रयोग करत गेलो तर हे पेयपान व्यक्ती म्हणून आपली तसेच कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक संबंध वृद्धिंगत करायला मदत करेल.
रस करण्यासाठी फळे निवडताना स्थानिक फळे जसे की, जांब, कमरक, आंबा, पेरू, चिकू, पपई, काजूगर, तुती, पपनस, अननस, ऊस, ताडगोळे, नारळपाणी, नीरासारख्या स्थानिक फळांचा समावेश करावा. बीट-गाजर-काकडी-कोबी-पालक-कोथिंबीरसारख्या भाज्यांचा वापर रसाला उत्तम रंग आणि चव देऊ शकतो. सरबते करतानाही लिंबू, आवळा, कोकम, चिंच, कैरी, बेलफळ, करवंदे, जांभूळसारख्या फळांपासून ताजी बनवावीत. त्यासाठी वाळा, मोगऱ्याची फुले घालून थंड केलेले पाणी वापरावे. आंबट फळांच्या रसामध्ये सोडा टाकून मोईतो तयार करू शकता.
पूर्णान्न दूध हे सुंठ किंवा हळद घालून, मध, विलायची तर कधी जायफळ घालून साजूक तूप किंवा बदाम-केशर घालून ऋतुमानानुसार घेऊ शकता. पपई, चिकू, आंबासारख्या गोड फळांचे रस आणि सुकामेवा घालून स्मुदीदेखील बनवू शकता. कडधान्यांचे किंवा पालेभाज्यांचे कढण म्हणजेच कडधान्य किंवा पालेभाज्या उकडलेले पाणी किंचित मीठ-साखर-ताक घालून थंड पिऊ शकता.
विविध फुलांचा वापर करूनदेखील चहा बनवता येतो. गावठी गुलाब, मोगरा, सोनचाफा, लाल जास्वंद, शेवंती, झेंडू, बहावा, गोकर्ण, कृष्णकमळ यासारख्या फुलांच्या केवळ पाकळ्या काढून स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात टाकाव्यात आणि गॅस बंद करून झाकण ठेवून द्यावे. काचेच्या पारदर्शक कपात हे चहा गाळले की, आधी डोळे निवतात आणि मग शरीर. सोनचाफा, मोगरा आणि गुलाबाचा मंद सुगंध थकवा दूर करून ताजेपणा देतो. गोकर्णीच्या निळ्या चहात लिंबू पिळले की, तो जांभळ्या रंगाचा होतो. मग किंचित मध घालून हा चहा पिणे, हा एक वेगळाच अनुभव आहे. याचप्रमाणे केलेले तुळस, पुदिना आणि गवती चहा यांचे चहा मस्त तरतरी आणतात. हे चहा उन्हाळ्यात थंड करून सरबत म्हणूनही पिऊ शकता.
काढे बनवण्यासाठी पारंपरिक आले किंवा सुंठ, तुळस, गवती चहा, काळीमिरी, पिंपळी, दालचिनी, विलायची, लवंगसारखे विविध मसाल्याचे पदार्थ वापरता येतात. यातील काही पदार्थ एकत्र करून किंवा वेगवेगळे काढेदेखील करू शकतो. काढा म्हणजे एक प्रकारे अर्क असतो. त्यामुळे दोन कप उकळत्या पाण्यात आपल्याला हवे ते मसाले घालून मंद आचेवर ते निम्मे उकळवून एक कप करावे आणि गरमच प्यावे. हे सर्व मसाले रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहेत. चहाला पर्याय असलेली ही विविध पेये बनवा आणि उत्तम आरोग्य मिळवा!

(लेखिका भारतीय पारंपरिक आहार संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com