

rat९p९.jpg-
६८७८६
खेर्डी : वाशिष्ठी नदीत याच ठिकाणाहून शहरासाठी पाणी उचलले जाते.
-------
चिपळूण शहरातील साडेतीनशे विहिरींची स्वच्छता
संभाव्य पाणीटंचाईसाठी तयारी; नैसर्गिक जलस्रोतांचा शोध, बोरवेल आणि टँकरचे नियोजन
चिपळूण, ता. ९ : शहराला उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता लक्षात घेऊन नगरपालिकेने आतापासूनच उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. शहरातील खासगी आणि सार्वजनिक मालकीच्या सुमारे साडेतीनशे विहिरींची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहरातील अन्य नैसर्गिक जलस्रोतांची माहिती संकलित केली जात आहे. वाशिष्ठी नदीतील कोयना धरणातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास पर्यायी स्रोतांचा वापर करून पाण्याची गरज भागवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
चिपळूण शहराला वाशिष्ठी नदीतून पाणीपुरवठा केला जातो; मात्र, उन्हाळ्यात नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. यापूर्वीही उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता, कमी दाबाने होणारा पुरवठा आणि काही भागांतील पाणीटंचाईसारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे भविष्यात पाण्याची मागणी वाढण्याची शक्यताही आहे. त्यामुळे केवळ मुख्य पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून न राहता पर्यायी स्रोत विकसित करण्यावर पालिकेचा भर आहे. शहरातील खासगी व सार्वजनिक विहिरींच्या स्वच्छतेसह अन्य नैसर्गिक जलस्रोत कोणते आणि ते कोणत्या भागात उपलब्ध आहेत, याची यादी प्रत्येक नगरसेवकाकडून मागवली आहे. नदीतील पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास विहिरींमधून पाणी उचलणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचा वापर करणे, असे पर्याय विचाराधीन आहेत. पालिकेच्या नियमित पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचत नसलेल्या भागांत बोरवेल घेण्याचे नियोजनही केले जात आहे. तसेच, संभाव्य पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करता यावा यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. गरज भासल्यास या पर्यायी व्यवस्थांचा वापर करून नागरिकांना दिलासा देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
मागील उन्हाळ्यात कोयना धरणातील पाणीसाठा कमी झाल्यामुळे वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या होत्या. त्याचा परिणाम वाशिष्ठी नदीच्या प्रवाहावर होऊन चिपळूणच्या पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा आणि वाशिष्ठीतील प्रवाह यांचा शहराच्या पाणीपुरवठ्याशी असलेला संबंध पुन्हा अधोरेखित झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन चिपळूण शहरातील पाण्याच्या प्रश्नावर नियोजन करण्याचे आव्हान पालिकेपुढे राहणार आहे.
कोट १
संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून पालिकेने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. शहरातील विहिरींची स्वच्छता, नैसर्गिक जलस्रोतांची माहिती संकलित करणे, पाणीपुरवठा योजनेचे पाणी न पोहोचणाऱ्या भागांत बोरवेलची व्यवस्था आणि टँकरद्वारे पुरवठ्यासाठी निविदा प्रक्रिया अशा उपाययोजनांवर काम सुरू आहे. भविष्यात पाण्याची उपलब्धता कमी झाली तरी पर्यायी स्रोतांचा वापर करून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.
- रोहित खाडे, पाणीपुरवठा अधिकारी
--------
चौकट
दृष्टिक्षेपात चिपळूण
* शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार : ५५ हजार १३९
* एकूण नळजोडण्या ५ हजार ७१५
* शहरातील तलावांची संख्या ३५०
* एकूण मालमत्ता ४ हजार ९७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.