

एसटीचा पास आता एका ‘क्लिक’वर
आवडेल तेथे कोठेही प्रवास योजना; घरबसल्या सुविधा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १२ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ योजनेतील चार व सात दिवसांचे पास आता ऑनलाइन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी एसटी आगारात जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. घरबसल्या पास काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पर्यटन, धार्मिक प्रवास तसेच सलग काही दिवस प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
चिपळूणमधून मुंबई, पुणे, रत्नागिरी, कोल्हापूरसह जिल्ह्यातील विविध भागांत एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. सुट्यांचा काळात कुटुंबासह प्रवास करणारे, विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईकांकडे जाणारे तसेच धार्मिक व पर्यटनस्थळांना भेट देणारे प्रवासी या पासचा उपयोग करू शकतात. या योजनेचा विशेष फायदा असा की, पासच्या वैधतेच्या कालावधीत संबंधित नियमांनुसार विविध मार्गांवर वारंवार प्रवास करता येतो. साध्या सेवेसाठी चार दिवसांच्या प्रौढ पासची किंमत १,१७० रुपये तर सात दिवसांच्या पासची किंमत २,०४० रुपये आहे. शिवशाही सेवेसाठी चार दिवसांचा पास १,५२० रुपये आणि सात दिवसांचा पास ३,०३० रुपये आहे. मुलांसाठी स्वतंत्र सवलतीचे दर आहेत. ऑनलाइन पासवर क्यूआर कोड राहणार असून, एसटीच्या ईटीआयएम यंत्राद्वारे त्याची तपासणी करता येणार आहे. त्यामुळे पासची पडताळणीही अधिक सुलभ होणार आहे. आगारात जाण्याची व रांगेत उभे राहण्याची गरज नाही. चार किंवा सात दिवसांच्या कालावधीत विविध ठिकाणी फिरण्याचे नियोजन करता येणार. सुट्यांमध्ये अनेक ठिकाणी प्रवास करणाऱ्या कुटुंबांना पासचा उपयोग. क्यूआर कोडमुळे पास तपासणी अधिक जलद. योजनेच्या नियमांनुसार एका मार्गापुरता प्रवास मर्यादित राहत नाही. ऑनलाइन सुविधेमुळे आगारातील गर्दी कमी होणार.
----
कोट १
चिपळूण आगारात सणासुदीच्या तसेच सुटीच्या काळात पास काढण्यासाठी होणारी गर्दी कमी होण्यासही या ऑनलाइन सुविधेची मदत होऊ शकते. प्रवाशांनी अधिकृत एसटी संकेतस्थळावरीलच सुविधेचा वापर करणे आवश्यक आहे.
- रणजीत राजेशिर्के, आगार व्यवस्थापक चिपळूण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.