हिंदी भाषेचा सन्मान करा

हिंदी भाषेचा सन्मान करा
Published on: 

‘हिंदी भाषेचा सन्मान करा’
चिपळूण : प्रत्येक भारतीय नागरिकाने हिंदी भाषेचा सन्मान करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान राज्य सल्लागार अनिलकुमार जोशी यांनी केले. चिपळूण तालुका हिंदी शिक्षक संघटना, पंचायत समिती शिक्षण विभाग, चिपळूण नगर परिषद, भारतीय स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात हिंदी पंधरवडा व राष्ट्रभाषा हिंदी दिनाचा सांगता समारंभ झाला. जोशी म्हणाले, हिंदी भाषेने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हिंदीचा जागतिक स्तरावरही प्रसार झाला असून, भाषिक सलोखा जपण्यासाठी तिचा सन्मान आवश्यक आहे. या कार्यक्रमात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता व गायन स्पर्धा, तर नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी साहित्यिकांच्या जीवनावर आधारित उपक्रम राबवण्यात आले.

प्रभातरोडवर उभारला
आकर्षक विद्युतखांब
चिपळूण : शहरातील प्रभाग क्र. १० मधील प्रभातरोड येथे प्रथमच अत्याधुनिक आणि आकर्षक विद्युतखांब उभारण्यात आले आहेत. या खांबांमुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली असून, रस्त्याला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले आहे. रसिका देवळेकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कामासाठी कपिल शिर्के यांनी विशेष प्रयत्न केले. नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पुढे नेण्यात आला. आकर्षक विद्युतखांबांमुळे प्रभातरोडच्या रूपात बदल दिसून येत असून, परिसराच्या सौंदर्यात भर घालणारा हा उपक्रम ठरला आहे.


पोफळीच्या विद्यार्थ्यांची
टपाल कार्यालयास भेट
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा, पोफळी येथील चौथीच्या विद्यार्थ्यांनी टपालदिनाचे औचित्य साधून पोफळी पोस्ट कार्यालयाला क्षेत्रभेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी पोस्टाच्या विविध योजना आणि दैनंदिन कामकाजाची माहिती जाणून घेतली. पोस्टमास्तर खेडेकर यांनी विद्यार्थ्यांना पत्रांचे प्रकार, पिनकोडमधील अंकांचे महत्त्व, शिक्का तयार करण्याची पद्धत, मनीऑर्डर, टपालाची स्थापना तसेच पोस्टाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून पोस्टाच्या कामकाजाविषयी अधिक माहिती घेतली.


ग्रीको-रोमन कुस्तीत
हर्षवर्धन जिल्ह्यात प्रथम
चिपळूण : मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालयातील अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी हर्षवर्धन मदने याने ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हर्षवर्धनने मेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळवले. या वेळी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका ताम्हणकर, क्रीडाशिक्षक पाटील, चोरमले, सुवारे आणि थत्ते यांच्यासह हर्षवर्धनचे वर्गमित्र उपस्थित होते. वर्गमित्रांनीही त्याच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करून त्याचे कौतुक केले.


गावतळेत बदकांच्या
पिल्लांना जीवदान
गावतळे : दापोली तालुक्यातील गावतळे येथील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूलमधील क्रीडांगणावर आईपासून वेगळ्या झालेल्या रानटी बदकांच्या लहान पिल्लांना प्राचार्या भक्ती सावंत यांनी सैरावैरा धावताना पाहिले. आईजवळ नसलेल्या या लहान पिल्लांवर भक्ष्यासाठी घार व कावळे आकाशात घिरट्या घालत होते. या पिल्लांचा प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी गावतळेतील ग्रामस्थ उत्तम पवार प्रयत्न करत होते. सावंत यांनी तत्काळ शाळेतील शिक्षक तथा राष्ट्रीय हरितसेनेचे प्रमुख शिरसाठ यांना विद्यार्थ्यांच्या मदतीने पिल्लांचे संरक्षण करण्याच्या सूचना दिल्या. शिरसाठ यांनी अथक प्रयत्न करून विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यातील तीन पिल्लांना सुरक्षितरित्या पकडले आणि तत्काळ दापोली येथील वनविभागाला याची माहिती दिली. याची दखल घेत काही वेळातच वनरक्षक गुरव आणि झाडे यांनी शाळेला भेट दिली व रानटी बदकांच्या या तीन पिल्लांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com