

घरडाच्या विद्यार्थ्यांचे
युवा महोत्सवात यश
चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, लवेल येथील विद्यार्थ्यांनी कला व सर्जनशीलतेच्या विविध प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचा नावलौकिक वाढवला. श्रावणी हिने एकल गायन प्रकारात तृतीय पारितोषिक मिळवले. तृतीय वर्ष (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग)चा विद्यार्थी शिवम कदम याने क्ले मॉडेलिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. तर एमसीए विभागातील आविष्कार पेढांबकर याने इंग्रजी कथालेखन, गट ‘ब’ या प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून आपल्या साहित्यिक कौशल्याची छाप पाडली.
घरडा इन्स्टिट्यूटमध्ये
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
चिपळूण ः लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थी उत्कृष्टता संघटनेतर्फे संस्थापक डॉ. घरडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. अभियंता दिन, माजी विद्यार्थी संवाद सत्र, ‘गिट आणि गिटहब’ कार्यशाळा तसेच टेकब्रिज (तंत्रसेतू) या उपक्रमांचा त्यात समावेश होता. ‘गिट आणि गिटहब’ कार्यशाळेत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रकल्प व्यवस्थापन, आवृत्ती व्यवस्थापन, बदलांची नोंद आणि सांघिक कार्याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. माजी विद्यार्थी सुमीत गुजर यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी, आवश्यक कौशल्ये आणि करिअरविषयक अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. प्रशिक्षण व प्लेसमेंट कक्षाच्या सहकार्याने आणि प्रा. सारिका वैलाली यांच्या मार्गदर्शनाखाली टेकब्रिज उपक्रम घेण्यात आला. यामध्ये विद्यार्थिनी इशिता भिंगारे हिने विजेतेपद पटकावले.
दुग्धजन्यपदार्थ निर्मितीचे
विद्यार्थ्यांना धडे
चिपळूण ः मांडकी-पालवण येथील गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय आणि जिजामाता महिला कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवासंकल्प अभियाना’अंतर्गत ‘मूल्यवर्धन डेअरी प्रोडक्ट्स’ या प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे आणि डॉ. दिव्या कोकणी यांनी विविध मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या पदार्थांचे आरोग्यविषयक महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. दुग्धजन्य पदार्थांपासून विविध उत्पादने तयार करून लघुउद्योग सुरू करता येतो. त्यातून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
ओणी शाळेत
पुस्तकांचे वाटप
साखरपा ः राजापूर तालुक्यातील ओणी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्र. तीनमध्ये कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या वेळी लोटणकर यांनी आपल्या काही कवितांचे वाचन केले. निवृत्त शिक्षक मधू आठल्ये यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. मोबाईलच्या विश्वात अधिक वेळ न घालवता पुस्तकांशी मैत्री करण्याचे आवाहन त्यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ठाकर यांनी मराठी शाळा बंद पडत असल्याबद्दल खंत व्यक्त करत मराठी भाषा आणि शाळा टिकवण्याची जबाबदारी अधोरेखित केली. लोटणकर यांच्या ‘आभाळाचे घर’, ‘धमाल गम्मत’ आणि ‘शब्दांचे फटाके’ या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.