संगमेश्वर ः तुणतुण्याच्या निनादात कोकणात देवीचा जागर

संगमेश्वर ः तुणतुण्याच्या निनादात कोकणात देवीचा जागर
Published on: 

rat14p22.jpg-
70038
संगमेश्‍वरः शांताराम भागवत आणि त्यांचे पुत्र सुधाकर भागवत.

संगमेश्वरात तुणतुण्याच्या सुरांवर घुमतोय देवीचा जागर
भागवत पिता-पुत्रांकडून जपणूक; गावाच्या सामूहिक जीवनाशी जोडणारा धागा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ : कोकणची लाल माती, गावागावांतील ग्रामदेवतांचा उत्सव, नवरात्रीच्या रात्री दरवळणारा भक्तीचा सुगंध आणि त्या प्रसन्न वातावरणात घुमणारा तुणतुण्याचा नाद… हे चित्र केवळ नवरात्रीच्या भक्तीचे नाही तर कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे जिवंत दर्शन घडवणारे आहे. नवरात्रोत्सव सुरू होताच गावोगावी तुणतुणे वाजवत घरोघरी जाऊन देवीचा जागर घालण्याची पारंपरिक प्रथा आजही संगमेश्वर परिसरात श्रद्धेने जपली जात आहे. या लोकपरंपरेची ज्योत शांताराम भागवत आणि त्यांचे पुत्र सुधाकर भागवत यांनी आजही तेवत ठेवली आहे.
नवरात्राच्या रात्री गावातील घराघरांत दिवे उजळतात, पूजा-अर्चा होते आणि संपूर्ण वातावरण भक्तीरसात न्हाऊन निघते. अशा मंगलमय वेळी हातात तुणतुणे घेऊन देवीची पारंपरिक गाणी गात घरोघरी पोहोचणारे शांताराम भागवत आणि सुधाकर भागवत यांचे आगमन उत्सवाची रंगत अधिक वाढवते. तुणतुण्याच्या तालावर घुमणारे देवीचे गीत आणि त्यातून व्यक्त होणारी अपार श्रद्धा यामुळे जुन्या काळातील लोकपरंपरांच्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. पूर्वी आधुनिक मनोरंजनाची साधने नव्हती, तरीही अशा पारंपरिक जागरातून गावोगावी भक्तीमय वातावरण निर्माण होत असे. देवीची गाणी, तुणतुण्याचे सूर आणि ग्रामदेवतेप्रती असलेली निष्ठा यांचा अनोखा संगम या जागरातून अनुभवायला मिळायचा. काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली आणि आधुनिकतेच्या प्रवाहात अनेक पारंपरिक लोककला मागे पडू लागल्या; मात्र, या बदलत्या काळातही भागवत यांनी तुणतुण्याच्या साथीने देवीचा जागर घालण्याची आपली निष्ठा सोडलेली नाही.
सध्या धामणी येथे राहत असलेले शांताराम भागवत यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र सुधाकर भागवतही या परंपरेत तितक्याच उत्साहाने सहभागी होत आहेत. त्यामुळे लोकसंस्कृतीचा हा अमूल्य वारसा पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षित पोहोचेल, अशी आशा निर्माण झाली आहे. परंपरा केवळ जपायची नसते तर ती पुढच्या पिढीला सोपवायची असते, हेच भागवत पिता-पुत्रांच्या कार्यातून दिसून येते. त्यांच्या तुणतुण्याचा प्रत्येक सूर कोकणच्या मातीत रूजलेल्या श्रद्धेची आणि सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देतो. नवरात्रोत्सवातील हा देवीचा जागर म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नसून गावाच्या सामूहिक जीवनाशी जोडलेला एक भावनिक धागा आहे.

चौकट
अनमोल स्वर हरवण्याची भीती
आजच्या तरुणपिढीनेही या पारंपरिक लोककलांचे महत्त्व ओळखून त्यांचे जतन करण्याची मोठी गरज आहे. कारण, तुणतुण्याचे सूर थांबले तर केवळ एक वाद्य शांत होणार नाही तर कोकणच्या लोकसंस्कृतीचा एक अनमोल आणि ऐतिहासिक स्वर कायमचा हरवण्याची भीती आहे. भागवत पिता-पुत्रांसारख्या निष्ठावंत उपासकांमुळेच देवीच्या जागराची ही भक्तीमय ज्योत आजही अखंड तेवत आहे.

कोट
आम्ही मुळचे निवे येथील रहिवासी. ही परंपरा आजोबा-पणजोबा असताना आमच्याकडे सुरू आहे. ती पुढे चालू राहिली पाहिजे, या विचाराने आम्ही पालन करत आहोत. नवरात्रात आम्ही घरोघरी जाऊन देवीच्या नावाने आरती करतो.
- शांताराम भागवत, संगमेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com