

- rat१४p३८.jpg-
P26O70147
ऑलिव्ह रिडले कासव
---
कासव विणीचा हंगाम वेळेआधीच सुरू
गुहागरमध्ये पहिले घरटे; अंड्यांच्या संरक्षणासाठी यंत्रणा सज्ज
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १५ : कोकणच्या किनारपट्टीवर दरवर्षी येणाऱ्या सागरी कासवांच्या (ऑलिव्ह रिडले) प्रजननाचा हंगाम यंदा नेहमीपेक्षा आधीच सुरू झाला आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर यंदाच्या हंगामातील सागरी कासवाचे पहिले घरटे (वीण) आढळले असून, ही अंडी सुरक्षित हॅचरीमध्ये (कासव संरक्षण केंद्र) संरक्षित केली आहेत. याला कांदळवन कक्षानेही दुजोरा दिला आहे.
कोकणात हिवाळ्याच्या तोंडावर म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या काळात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात; मात्र, गेल्या काही वर्षांत हा हंगाम प्रामुख्याने जानेवारी ते मार्च असा पुढे सरकल्याचे दिसून येत होते. यंदा मात्र ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात गुहागर किनाऱ्यावर पहिले घरटे आढळल्याने निसर्गप्रेमी आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सहा किलोमीटर लांबीचा गुहागरचा समुद्रकिनारा कासवांच्या प्रजननासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. गेल्या वर्षी या किनाऱ्यावर तब्बल १४५ घरटी आढळून आली होती. यंदाही पहिल्याच घरट्याच्या शोधाने गुहागरवरूनच कोकणातील कासव विणीच्या हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे. स्थानिक कासवमित्र, ग्रामस्थ, कांदळवन कक्षाकडून या अंड्यांचे रात्रंदिवस रक्षण केले जात आहे. योग्य कालावधीनंतर अंड्यांमधून पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना सुरक्षितपणे समुद्रात सोडले जाणार आहे.
---
गुहागर किनाऱ्यावर सर्वाधिक घरटी
वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या नोंदीनुसार, रायगड जिल्ह्यातील चार, रत्नागिरीतील ३० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधारण २० किनाऱ्यांवर सागरी कासवांची घरटी सापडतात. या सर्व किनाऱ्यांपैकी महाराष्ट्रात सागरी कासवांची सर्वाधिक घरटी गुहागरच्या किनाऱ्यावर आढळतात. गुहागरव्यतिरिक्त वेळास, आंजर्ले आणि मुरूड हे किनारेही कासवांच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.